04/02/26
Breaking News

जयश्री दूध एजन्सी जळून खाक; २५ लाखांचा फटका, शॉर्टसर्किटचा संशय

गंगाखेड / रामप्रसाद ओझा – गंगाखेड शहरात शनिवारी (दि. २४) मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास जयश्री दूध एजन्सीला भीषण आग लागून सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची खळबळजनक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या आगीत एजन्सीतील फ्रीज, डीप फ्रीझर, विद्युत उपकरणे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पाव, खारी, टोस्ट तसेच अन्य महत्त्वाचे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण एजन्सी आगीच्या विळख्यात सापडली होती.

आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दल व पोलिसांना माहिती दिली. गंगाखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या दुर्घटनेत जयश्री दूध एजन्सीचे मालक मंचकराव शिंदे व कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेवेळी एजन्सी बंद असल्याने जीवितहानी टळली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून विद्युत वायरिंगची वेळोवेळी तपासणी व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …