28/02/26
Breaking News

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!’विज्ञानवारी’ लेव्हल–III साठी जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड

सेलू (प्रतिनिधी):
परभणी येथील परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञानवारी पात्रता पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय परीक्षेत नूतन विद्यालय, सेलू येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची तृतीय फेरी (लेव्हल–III) जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.

विज्ञानवारी सेलू तालुकास्तरीय परीक्षेत सान्वी गजानन शितळे हिने प्रथम क्रमांक,तन्मय जयकिशन भुतडा याने द्वितीय क्रमांक, तर आराध्या नितीन रोडगे हिने तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात होणार आहे. या परीक्षेसाठी सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान नोंदणी असून, १० वाजल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होणार आहे. या जिल्हास्तरीय फेरीसाठी सुधीर सोनूनकर, प्रसाद वाघमारे, दीपक शिंदे व अशोक लाड हे जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

या यशाबद्दल नूतन विद्यालय, सेलू येथे विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड तसेच उपक्रम समन्वयक मार्गदर्शक शिक्षिका सौ. मीरा शेटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलूचे
अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर,
सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी आणि प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी …