21/07/26
Breaking News

हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त!’ई-शिवाई’ बसचे उद्घाटन

हिंगोली,दि 01 ः
हिंगोलीकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आधुनिक आणि पर्यावरणपूरक अशा ‘ई-शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, आज १ जून २०२६ रोजी हिंगोली आगारात या बसेसचे भव्य उद्घाटन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण २१ ई-बसेस मंजूर झाल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४ बसेस आगारात सुखरूप दाखल झाल्या आहेत.

या आधुनिक ई-शिवाई बसचे लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. याप्रसंगी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते  अशोक धामणे, आगार व्यवस्थापक  किशोर महाजन, स्थानकप्रमुख श्रीमती सुनिता गोरे आणि वाहतूक निरीक्षक  फिरोज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

…दीड तासात चार्जिंग, ३०० किमीचा सुसाट प्रवास!.
या ई-बसेसची वैशिष्ट्ये सांगताना आगार व्यवस्थापनाने माहिती दिली की, ही बस केवळ दीड तासात (१.५ तास) पूर्ण चार्ज होते. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही बस तब्बल ३०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास विनाखंड करू शकते. यामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार आहे.
‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर धावणार बसेस
हिंगोली आगारातून या पहिल्या टप्प्यातील बसेस खालील प्रमुख मार्गांवर प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत:
हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर
हिंगोली ते नांदेड
हिंगोली ते अकोला
हिंगोली ते परळी
हिंगोली ते रिसोड
अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
या सोहळ्याला दिगंबर दराडे, सचिन पारीख, वैभव वरवंटे, मुकेश ठोंबरे यांच्यासह ‘ईव्ही ट्रान्स’ व ‘एसव्ही ट्रान्स’ कंपनीचे प्रतिनिधी श्री. कसबे, संकेत पवार, सिद्धेश्वर केंद्रे, श्री. वलेकर आणि चौधरी यांच्यासह आगार व वाहतूक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.हिंगोलीकरांसाठी पर्यावरणपूरक प्रवास:
“हिंगोली आगारात दाखल झालेल्या या ई-बसेसमुळे प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी सेवा मिळणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी या बसेस मैलाचा दगड ठरतील,” असा विश्वास याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन ई-बस सुरू झाल्यामुळे हिंगोलीकरांमधून अत्यंत समाधान व्यक्त होत आहे.

Check Also

पूर्णा तालुक्यात 5.5 कोटींची शेतकरी फसवणूक; 6,800 क्विंटल शेतमाल घेऊन भुसार व्यापारी फरार

₹5.5 Crore Farmer Scam! Trader Absconds with 6,800 Quintals of Produce पूर्णा प्रतिनिधी / सुशील …