16/06/26
Breaking News

कानडखेड शिवारातील विहिरीत ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

पुर्णा, ता. १४ (प्रतिनिधी): तालुक्यातील कानडखेड शिवारातील एका विहिरीत अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता. १३) सकाळी ही घटना उघडकीस आली असून, पुर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा शहरातील महात्मा गांधी रोड येथील व्यापारी प्रेमचंद नेमीचंद खिंवसरा हे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कानडखेड शिवारातील गट क्रमांक १२० मधील आपल्या शेतात गेले होते. त्यांच्यासोबत शेतातील सालगडी शेख सलाम शेख युनुस हाही उपस्थित होता. शेतातील पाण्याच्या मोटारीचा स्टार्टर खराब झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू असताना शेख सलाम हा विहिरीकडे गेला. त्यावेळी त्याला विहिरीच्या पाण्यात एका इसमाचा मृतदेह तरंगताना दिसला.
घटनेची माहिती मिळताच प्रेमचंद खिंवसरा यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत (फक्त पॅन्ट परिधान केलेली) विहिरीत तरंगताना आढळून आला. तसेच विहिरीच्या कडेला निळ्या रंगाचा अप्पर पडलेला दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पुर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पीएसआय श्रीनिवास पडलवार, हेड कॉन्स्टेबल सोनकांबळे, हेड कॉन्स्टेबल आळसे, हेड कॉन्स्टेबल राहुल मोरे आणि पोलीस शिपाई सुधीर काळे यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून तो कोण आहे, कुठील आहे तसेच त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय श्रीनिवास पडलवार करीत आहेत.
अनोळखी मृताची ओळख पटविण्याचे आवाहन
मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसल्याने संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पुर्णा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Check Also

 ‘वनामकृवि’ व ‘मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र’ यांच्यात सामंजस्य करार!

हिंगोली: मराठवाडा व राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक …