17/10/26
Breaking News

ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर;

सेलू (प्रतिनिधी)
वीज ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया राबवू नये तसेच स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील विविध भागांमध्ये पारंपरिक वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. मात्र अनेक ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, बिल आकारणीची पद्धत, प्रीपेड प्रणाली, तांत्रिक बाबी व संभाव्य परिणाम याबाबत पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे योग्य नसल्याचे ग्राहक पंचायतने नमूद केले आहे.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची खात्री शासन व वीज वितरण कंपनीने द्यावी. तसेच स्मार्ट मीटर संदर्भातील सर्व माहिती पारदर्शकपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया स्थगित करावी, व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी व ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी सांगितले की, कोणतीही नवीन व्यवस्था लागू करताना ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांच्या शंकांचे समाधान करणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या हिताला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय त्यांच्या संमतीशिवाय घेतला जाऊ नये, अशी भूमिका ग्राहक पंचायतची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …