24/06/26
Breaking News

खासदारांना हिंगोलीत पाय ठेवू देणार नाही,उबाठा गटाचा इशारा

हिंगोली (विशेष प्रतिनिधी) :
“नांदेडमध्ये कितीही गाजावाजा झाला असला, तरी संबंधित खासदारांनी आमच्या हक्काच्या मतांचा बाजार मांडला आहे. मतदारांशी प्रतारणा करून त्यांनी स्वतःचे मत विकले आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. जर त्यांच्यात हिंमत असती, तर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षांतर करायला हवे होते. पक्षाशी आणि मतदारांशी केलेल्या या गद्दारीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या काळजावर खोल घाव घातला गेला आहे,” असा संतप्त आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी केला आहे. तसेच, “या खासदाराला हिंगोलीत पाय ठेवू देणार नाही, ते जिल्ह्यात आल्यास शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे तोंड काळे केले जाईल,” असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

पक्षांतरामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप
संबंधित खासदारांनी नुकताच नांदेड येथे मोठ्या गाजावाजात दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. यावर हिंगोली जिल्ह्यातील उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नांदेडमध्ये प्रवेश सोहळा सुरू असतानाच, तिथल्या स्थानिक शिवसैनिकांनीही त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला होता.
‘राजीनामा देऊन जायला हवे होते’
शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही अहोरात्र कष्ट करून, मतदारांच्या विश्वासावर या खासदाराला निवडून आणले होते. परंतु, त्यांनी मतदारांच्या आणि शिवसैनिकांच्या निष्ठेची किंमत शून्य केली. जर ते पदाचा राजीनामा देऊन गेले असते, तर शिवसैनिकांना इतके वाईट वाटले नसते. मात्र, त्यांनी स्वार्थासाठी पाऊल उचलल्याने निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत.”
हिंगोलीत तोंड काळे करण्याचा इशारा
खासदारकीचा राजीनामा न देता पक्षांतर केल्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर, “संबंधित खासदारांना आता हिंगोलीचा विसर पडला आहे. पण ज्या दिवशी ते हिंगोली जिल्ह्यात पाऊल ठेवतील, त्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल आणि त्यांचे तोंड काळे केले जाईल,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …