हिंगोली (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विश्वास, विकास आणि जनकल्याण या यशस्वी १२ वर्षांच्या ऐतिहासिक कार्यकाळाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने जनसंपर्क अभियान राबविण्यात आले.या अभियानांतर्गत शिवाजी मुटकुळे यांनी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये व्यापारी बांधव आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना, देशपातळीवरील ऐतिहासिक विकासकामे आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित माहिती पत्रकांचे वाटप करून सरकारच्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. या मोहिमेदरम्यान शिवाजी मुटकुळे यांनी बाजारपेठेतील प्रमुख व्यावसायिक आनंद निलावार, दीपक कटके, सचिन गुंडेवार, दिनेश कालावडीया, डॉ. विजय निलावार, प्रणव दोडल, लक्ष्मीकांत व्यव्हारे, प्रीतम बडेरा यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.
व्यापाऱ्यांशी संवाद साधताना शिवाजी मुटकुळे यांनी त्यांच्या स्थानिक समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या.जनतेचा सहभाग आणि विश्वास यातूनच खऱ्या विकासाचा मार्ग अधिक मजबूत होतो. व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या प्रत्येक रास्त प्रश्नाचे आणि समस्येचे सकारात्मक निवारण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,अशी ग्वाही मुटकुळे यांनी यावेळी दिली.
या जनसंपर्क अभियानात भाजपचे जिल्हा प्रवक्ते विलास गोरे, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, शहर कार्याध्यक्ष पवन उपाध्ये, मंडळ अध्यक्ष माणिक लोडे, बाबाराव घुगे, पद्माकर नायक, नितीन राठौर,आशिष शर्मा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com