16/10/26
Breaking News

HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीचे अवघे उरले काही तास

वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. राज्यातील 1 एप्रिल 2029 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी आता फक्त एकच दिवसाची मुदत उरली आहे. शासनाने दिलेली 30 जून 2026 ही अंतिम मुदत संपल्यानंतर, म्हणजेच 1 जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुदत संपल्यानंतर पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी रस्त्यावर उतरून संयुक्त किंवा स्वतंत्रपणे दंडात्मक कारवाई सुरू करणार आहेत. इतकेच नाही तर HSRP नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) अनेक महत्त्वाची कामेही प्रशासनाकडून पूर्णपणे रोखण्यात येणार आहेत.

आरटीओमधील ‘या’ महत्त्वाच्या सेवा होणार बंद

HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना 1 जुलैपासून आरटीओमध्ये मोठा फटका बसणार आहे. अशा वाहनांचे हस्तांतरण (Vehicle Transfer), पत्ता बदलणे, वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी (Re-registration), वाहनातील इतर बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या कोणत्याही आरटीओ सेवा उपलब्ध होणार नाहीत.

मात्र, वाहनधारकांना तात्पुरता दिलासा म्हणून वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या (Fitness Certificate) नूतनीकरणासाठी सध्या ही अट लागू राहणार नाही.

अपॉइंटमेंट घेतलेल्यांना तात्पुरता दिलासा

दरम्यान, ज्या वाहनधारकांनी 30 जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अपॉइंटमेंट (Appointment) घेतली आहे, अशा वाहनधारकांना 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. मात्र, ज्यांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही, त्यांना थेट दंडाचा सामना करावा लागेल.

राज्यात हे काम सुलभ व्हावे म्हणून तीन झोन निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज, रिअल इंडस्ट्रीज आणि एफटीए HSRP सोल्यूशन्स या अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाने निश्चित केलेले अधिकृत दर

सर्वसामान्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने या नंबर प्लेट्सचे अधिकृत दर निश्चित केले आहेत. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी 450 रुपये, तीनचाकी वाहनांसाठी 500 रुपये, तर हलकी मोटार वाहने (कार) आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये दर ठरवण्यात आला आहे (हा दर जीएसटी वगळून असून यात फिटमेंट शुल्काचा समावेश आहे). केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अन्वये ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

 शासकीय वाहनांनाही आदेश

सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर 30 जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडेही गाडी असेल, तर दंडात्मक कारवाई आणि आरटीओचा मनस्ताप टाळण्यासाठी त्वरित ही नंबर प्लेट बसवून घ्यावी.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …