17/10/26
Breaking News

चित्रकला भावनिक, सर्जनशील व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम-गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे

-नूतन विद्यालयात शासकीय बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली

सेलू / प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित शासकीय बालचित्रकला स्पर्धा नूतन विद्यालय, सेलू येथे उत्साहात पार पडली. यावेळी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या भावनिक, सर्जनशील व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी, हस्तकौशल्य तसेच स्वतंत्र अभिव्यक्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी चित्रकलेतील विविध संधींचा लाभ घेऊन आपल्या कलागुणांना योग्य दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण देशपांडे, प्रमुख उपस्थितीत केंद्रप्रमुख शेख मौजम, चित्रकला विभाग प्रमुख किशन कटारे उपस्थित होते.

 

 

गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे पुढे बोलताना म्हणाले की, शासनाने बालचित्रकला स्पर्धेला अधिक व्यापक प्रोत्साहन देण्यासाठी २०२५-२६ पासून बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिसांची रक्कम अनुक्रमे २,०००, १,०००, ५०० व २५० रुपये करण्यात आली असून, एकूण बक्षिसांची रक्कम २२० रुपयांवरून ३,७५० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस १०,००० रुपये, द्वितीय ५,००० रुपये, तृतीय २,५०० रुपये आणि चतुर्थ १,००० रुपये करण्यात आले असून, एकूण बक्षिसांची रक्कम ६०० रुपयांवरून १८,५०० रुपयांपर्यंत वाढली आहे. तसेच सन २०२५-२६ पासून या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत करण्यात येत आहे.

 

 

नूतन विद्यालय, सेलूचे मुख्याध्यापक श्री. किरण देशपांडे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना चित्रकलेतील विविध संधी, साधना व संकल्पना यांची माहिती देत कलागुणांचा आगामी शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात कसा उपयोग होऊ शकतो, हे सविस्तर स्पष्ट केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक शंकर बदनापोड, पर्यवेक्षक गणेश माळवे, चित्रकला विभागप्रमुख श्री. किशन कटारे व श्री. फुलसिंग गावित यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किशन कटारे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळू बुधवंत यांनी केले. शासनाच्या नव्या निर्णयामुळे बालचित्रकला स्पर्धेला मिळालेले वाढीव प्रोत्साहन विद्यार्थ्यांमधील कलागुणांना नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Check Also

 फरार आरोपीला औंढा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औंढा नागनाथ,दि 17 (प्रतिनिधी)ः औंढा नागनाथ पोलीस स्टेशन औंढा येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या पुण्यातील दोन …