29/08/26
Breaking News

पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

हिंगोली शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. २९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, आत्महत्या करताना संबंधित अधिकारी पोलिस गणवेशातच होते. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल गंगलवाड (वय ५०) असे या मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड हे आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाकडे आले होते. यावेळी पूर्णाकडून अकोलाकडे जाणारी रेल्वे खटकाळी पुलाजवळ आली असता, गंगलवाड यांनी अचानक रेल्वेसमोर उडी घेतली. या भीषण धडकेत त्यांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले.

या घटनेची माहिती रेल्वेच्या लोकोपायलटने तात्काळ स्टेशन मास्तर यांना दिली. त्यानंतर स्टेशन मास्तरांनी हिंगोली पोलिसांना या घटनेबाबत कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपककुमार मस्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली असता, गंगलवाड यांचा मृतदेह पोलीस गणवेशातच आढळून आला.

दोन महिन्यांपूर्वीच झाली होती बदली

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मृत गंगलवाड हे दोन महिन्यांपूर्वीच परभणी येथून बदली होऊन हिंगोली जिल्हा पोलिस दलात रुजू झाले होते. सध्या ते पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Check Also

ई बस मध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत सवलतीचा लाभ द्या,व्हाईस ऑफ मीडियाची मागणी,

परभणी, दि१७ अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मध्ये मोफत सवलत देण्याची मागणी …