29/08/26
Breaking News

अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार

मराठा आरक्षण  आणि कुणबी प्रमाणपत्र, जात पडताळणी समिती या मुद्द्यांवरुन राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, जरांगे पाटलांनी  उपोषणाला सुरुवात केली असून आज पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाल्याचं दिसून आलं. या बाधवांना जरांगे पाटलांनी संबोधित करताना, लवकरच मुंबई गाठण्याची तारीख जाहीर करू असे म्हटले.

आपल्याला महाराष्ट्रातील, मुंबईतील मराठ्यांनी नावं नाही ठेवले पाहिजे, हेही संस्कार जपले पाहिजेत. यावेळी, विजयापासून लांब जाऊ द्यायचं नाही ही जबाबदारी आपली आहे. यंदाचे उग्र आंदोलन सुद्धा मराठ्यांच्या शांततेपणात उग्र वाटले पाहिजे. हे शेवटच आंदोलन, याच्या मागणीत एकही माघार नाही. महाराष्ट्रातील बांधव बोलावून मुंबईची तारीख ठरवणार आहे. तीन दिवसात मराठा मुंबईला नेऊन वापस आणलेला आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे पक्की तयारी करायची आहे. येत्या 12 तारखेला मुंबईच्या तारखेची घोषणा करू,  मुंबईत 5 टप्प्यात आंदोलन होईल अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

मी काय चीज आहे हे अजित दादा, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना माहिती आहे, मी साधं रसायन नाही, त्यांच्यात चर्चा होती. त्यामुळे, ही लढाई आपल्याला नियोजनबद्ध करावी लागणार आहे. फडणवीस-शिंदेंच्या डोक्याला मुंग्या आल्या पाहिजेत. सरकारला माज आलाय, आमचे कोणीच काही करू शकत नाही असं त्यांना वाटतंय. पण, मराठ्यापुढे सत्तेच शहाणपण चालत नाही. एकदा प्लॅनिंग झाली तर मुंबईच नाही दिल्ली सुद्धा हलवू शकतो, अशा शब्दात जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला आहे. मला बोलता आले नाही तरी मला वर्षावर घेऊन जा, मी बारका दिसतो पण 10-12 जण पाडू शकतो. मुंबईला 40-45 लाख मोटरसायकल काढायच्या आहेत, मी एकटा ट्रकवर येतो, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

60 च्या आतील बांधवांनीही मुंबईला या

मनोज जरागे यांनी साठीतील मराठा समाज बांधवांना देखील आवाहन केलंय. म्हातारे माणसं जे 50-60 च्या आतचे आहेत, त्यांनी मुंबईला चला. तरुण झुंजणार तर मग म्हातारे नोकरी करणार का? पारावर वेळ घालवण्यापेक्षा, समाजासाठी लढा, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

12 तारखेला मुंबईची तारीख ठरणार

इथे कोणताच समाज सुखी नाही. मुंबईतील ना मराठी माणूस सुखी आहे, ना परप्रांतीय, मराठवाडी आणि जैनसुद्धा सुखी नाही. डी.बी. पाटलांचे नाव सुद्धा विमानतळाला द्यायला हे तयार नाहीत, यांना माज आलाय. 12 तारखेला जी तारीख ठरेल त्याची तयारी करावी. मुंबईतील मराठ्यांनी फक्त जेवण कमी पडू देऊ नये, असे म्हणत पुन्हा एकदा मुंबईला जायची तयारी सुरू असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Check Also

ई बस मध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत सवलतीचा लाभ द्या,व्हाईस ऑफ मीडियाची मागणी,

परभणी, दि१७ अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मध्ये मोफत सवलत देण्याची मागणी …