पाथरी (प्रतिनिधी):
पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द शिवारातील टाऊन-३ भागातील शेतीपंपांसाठीची सिंगल फेज वीज रात्रीच्या वेळी नियमित सुरू ठेवावी, या मुख्य मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी महावितरणच्या पाथरी उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. मागणी वेळेत मान्य न झाल्यास मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी महावितरण कार्यालयावर शेतकरी व शेतमजुरांच्या वतीने भव्य ‘बैलगाडी मोर्चा’ काढण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
पाथरी व रामपुरी खुर्द टाऊन-३ परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे आखाडे (वस्त्या) असून, अनेक शेतकरी व शेतमजूर कुटुंबे आपल्या जनावरांसह तेथेच वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद राहिल्याने परिसरात चोरीचा धोका वाढला आहे. तसेच रात्रीच्या अंधारात साप व इतर विषारी वन्यप्राण्यांचा वावर असल्याने जीवाला धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांचे शिक्षण सुरू असून रात्री वीज उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठीण प्रसंगी महावितरणने सहकार्याची भूमिका घेऊन रात्रीचे भारनियमन तत्काळ बंद करावे आणि टाऊन-३ भागातील सिंगल फेज वीजपुरवठा पूर्ववत नियमित ठेवावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मागणीचा गांभीर्याने विचार न झाल्यास ६ ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन छेडत महावितरण कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर टाऊन-३, पाथरी व रामपुरी खुर्द शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Shabdraj www.shabdraj.com