17/10/26
Breaking News

शेतमाल खरेदी करून ४६ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

जिंतूर, प्रतिनिधी : शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हरभरा, तूर, हळद आणि भुईमूग यांसह विविध शेतमाल खरेदी करून त्याचे पैसे न देता तब्बल ४६ लाख ४२ हजार ९२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जिंतूर तालुक्यातील केहाळ रामनगर तांडा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनिल बंडे, श्रीराम बंडे आणि नागेश बंडे या तिघांविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात १५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात आणखी ३० ते ४० शेतकरी फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती समोर येत असल्याने परिसरातील शेतकरीवर्गात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हरीभाऊ राठोड यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी गणेश ट्रेडर्सचे अनिल बंडे आणि श्रीराम बंडे यांच्याकडे आपला शेतमाल विक्रीसाठी दिला होता. सुरुवातीला काही व्यवहारांचे पैसे देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करण्यात आला; मात्र मालाची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. २६ डिसेंबर २०२५ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत हे व्यवहार झाल्याचे नमूद आहे.

सहा शेतकऱ्यांची ४६ लाखांची थकबाकी

तक्रारीनुसार, संजय राठोड यांचे ६ लाख २२ हजार ४१२ रुपये, विजय आडे यांचे ६६ हजार ७५० रुपये, वसंत जाधव यांचे १२ लाख ६० हजार २८८ रुपये, हरिराम शिंदे यांचे १५ लाख रुपये, रामा जाधव यांचे २ लाख ३१ हजार रुपये, तर भास्कर पवार यांचे ९ लाख ६२ हजार ४७० रुपये थकीत आहेत. या सहा शेतकऱ्यांची एकूण थकबाकी ४६ लाख ४२ हजार ९२० रुपये आहे.

शेतमाल विकूनही पैसे मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. संजय हरीभाऊ राठोड यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिंतूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. अन्य शेतकऱ्यांचीही फसवणूक झाली आहे का, याबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Check Also

आरक्षण उपवर्गीकरण मोर्चाच्या तयारीसाठी सेनगावात मातंग समाजाची बैठक

सेनगाव प्रतिनिधी मोहन कांबळे  मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबर रोजी सेनगाव येथे आयोजित …