सेलू,दि 18 (प्रतिनिधी)ः
सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र वालूर येथे वै. प. पु. ह.भ.प.अण्णासाहेब महाराज वालूरकर यांच्या पुण्यतिथी( १७१वा ) सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
उपजोनिया पुढती येऊ |काला खाऊ दहीभात | या जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर विवेचन करताना महाराज म्हणाले की, भक्तांसोबत एकत्र येऊन काल्याचा प्रसाद खाण्याचा आनंद प्राप्त होतो.वैकुंठात भलेही सुख मोठे असेल पण पंढरीच्या वाळवंटात संतांसोबत मिळणाऱ्या भक्तीच्या आनंदाची सर कशालाच नाही. चंद्रभागेचे वाळवंट अतिशय सुंदर, पवित्र आणि उत्तम आहे.
भक्तीमधील समर्पणभाव महत्वाचा आहे.भगवान श्रीकृष्णाने काला खाऊन ऐकतेची, समतेची व मैत्रीची शिकवण दिली. आनंद व समाधानाची तृप्ती काल्यातून मिळते असे प्रतिपादन त्यांनी केले.
दिनांक ११ऑक्टोबर ते १७ऑक्टोबर दरम्यान वै.प.पु.अण्णासाहेब महाराज समाधीस्थान श्रीक्षेत्र वालूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बालासाहेब महाराज नेब(जांब समर्थ ), मयूर महाराज वालूरकर, गणेश महाराज कटारे, महादेव महाराज इरळदकर, प्रसाद महाराज काष्टे (रोहिणा), शंतनू महाराज पाठक (वालूर ) आदी कीर्तनकार यांची कीर्तनसेवा संपन्न झाली.ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज वालूरकर (फडकरी, माऊलींच्या रथामागे दिंडी क्र.१५) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.
Shabdraj www.shabdraj.com