19/10/26
Breaking News

नशेच्या विळख्यात अडकू नका; आयुष्याला नवी दिशा द्या! – निळकंठ गायकवाड

हिंगोली,दि 18 
व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाका, शरीराची काळजी घ्या आणि देशाच्या विकासात योगदान द्या, असे आवाहन व्याख्याते निळकंठ गायकवाड यांनी तरुणाईला केले. ‘माझा भारत’ अभियानांतर्गत आयोजित युवा संसदेत तरुणाईने व्यसनमुक्त भारताचा संकल्प केला.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय युवा नेतृत्व योजना आणि ‘माझा भारत’ उपक्रमांतर्गत शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे ब्लॉक स्तरावर ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ या संकल्पनेवर आधारित ‘शेजारील युवा संसद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यसनमुक्तीच्या चळवळीला बळ दिले.

जीवन अनमोल; व्यसनापासून दूर राहा!
———–
व्याख्याते निळकंठ गायकवाड यांनी शेरोशायरी, प्रेरणादायी विचार आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून तरुणाईला जीवनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रभावी शैलीला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी अडकत असून, परदेशातून येणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गंभीर आव्हान निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि जीवनाला सकारात्मक दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

लघुपटातून व्यसनमुक्तीचा संदेश
——————-
कार्यक्रमात ‘बदलाची गोष्ट नशामुक्त भारताचा प्रवास’ हा लघुपट दाखवून तरुणांमध्ये जनजागृती करण्यात आली. देशासमोरील आव्हाने, व्यसनमुक्तीचे उपाय आणि सुदृढ जीवनशैली यावर युवा प्रतिनिधींनी खुली चर्चा केली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित युवकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.

यावेळी युवा अधिकारी श्रद्धा वीर, डॉ. राजेंद्र वीर तसेच सय्यद कोचिंग क्लासेसचे संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे युवा संसदेच्या माध्यमातून व्यसनमुक्त भारताचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

Check Also

गोपाळकाला आनंदोत्सव व समाधानाचे प्रतीक -ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज वालूरकर

सेलू,दि 18 (प्रतिनिधी)ः सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र वालूर येथे वै. प. पु. ह.भ.प.अण्णासाहेब महाराज वालूरकर यांच्या …