परभणी, दि १९ : शासकीय कार्यालयांतील स्वच्छता आणि कार्यालयीन शिस्तीबाबत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी कठोर भूमिका घेतली आहे. परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान शुक्रवारला विविध शासकीय कार्यालयांची पाहणी करताना सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता आढळल्याने त्यांनी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.
शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि शिस्त रुजविण्यासाठी जी. श्रीकांत यांनी १७ सप्टेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली. प्रत्येक सोमवारी कार्यालयीन कामकाजाच्या सुरुवातीचा एक तास श्रमदानातून कार्यालय स्वच्छ ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कार्यालयप्रमुखांनी स्वतः पुढाकार घेऊन या उपक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांतील शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहे, कार्यालय, कार्यालयातील कपाटे, छत, पंखे, टेबल-खुर्च्या तसेच नागरिकांसाठीच्या बैठक व्यवस्थेची नियमित स्वच्छता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यालयाच्या आवारापासून तर अंतर्गत कार्यालयामध्ये ही स्वच्छता असणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक स्वच्छतागृहांना कुलूप न लावता ती नागरिकांसाठी खुली ठेवणे आणि त्यांची स्वच्छता सुनिश्चित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
स्वच्छतेच्या नियमांचे पालन होते की नाही, यासाठी कार्यालयांना आकस्मिक भेटी देऊन तपासणी केली जात आहे. अस्वच्छता आढळल्यास संबंधित कार्यालयप्रमुखांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे विभागातील सर्व कार्यालयप्रमुखांनी स्वच्छतेला केवळ औपचारिकता न मानता दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग बनविण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी देखील अस्वच्छतेच्या संदर्भात प्रशासनाला लक्षात आणून द्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वतः विभागीय आयुक्त दर सोमवारी छत्रपती संभाजीनगर मुख्यालयात एक तास देऊन स्वच्छतेसाठी आग्रही असतात. त्यांनी स्वतःही श्रमदान करून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छतेचा अभाव आढळल्यास नागरिकांनी यासंदर्भात लक्षात आणून द्यावे. तसेच नागरिकांनी देखील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना स्वच्छता पाळावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. सर्व शासकीय कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी मदत करावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
***
Shabdraj www.shabdraj.com