21/10/26
Breaking News

​ऐतिहासिक गंगाखेड येथे रथोत्सव भक्तिभावात उत्साहात संपन्न

रामप्रसाद ओझा
गंगाखेड,दि 21
गंगाखेड शहराची ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा श्री भगवान बालाजी महाराजांचा पारंपरिक रथोत्सव सोहळा आज भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात भगवान बालाजींच्या उत्सवमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थिती लावली. पारंपरिक धार्मिक विधी, मानपान आणि नगरप्रदक्षिणेने संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

दुपारी साडेतीन वाजता बालाजी मंदिर संस्थानचे मुख्य पुजारी, संस्थानिक व मानकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक परंपरेनुसार उत्सवमूर्तीला मंदिरातून रथापर्यंत आणण्यात आले. यावेळी पायघड्या घालण्याचा तसेच उत्सवमूर्तीला नेसविण्याचा पारंपरिक मान घण परिवारातील सदस्यांकडे असल्याने त्यांनी आपले हे धार्मिक कर्तव्य परंपरेनुसार पार पाडले.
यानंतर नितीन चौधरी यांच्या निगराणीखाली भगवान बालाजी महाराजांच्या रथाने नगरप्रदक्षिणेसाठी भव्य प्रस्थान केले. रथाच्या आगमनाने शहरातील प्रमुख मार्गांवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शनी मंदिर, बुद्ध विहार, श्रीराम चौक आदी मार्गांवरून रथाची नगरप्रदक्षिणा पार पडली. या मार्गावर ठिकठिकाणी रथावर विराजमान असलेल्या भगवान बालाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीची भाविकांनी आरती करून दर्शन घेतले.
नगरप्रदक्षिणेदरम्यान राजमोहल्ला, मोठा मारुती, श्रीराम झोपडी आणि गोदाकाठ मार्गे रथ पुन्हा बालाजी मंदिरात दाखल झाला. त्यानंतर भगवान बालाजी महाराजांची घोड्यावरून दौड हा पारंपरिक धार्मिक सोहळ्याचा महत्त्वपूर्ण भाग पार पडला. या धार्मिक परंपरेमुळे रथोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली.
गंगाखेडचा हा ऐतिहासिक रथोत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि पिढ्यान्‌पिढ्या जतन केलेल्या परंपरेचे दर्शन घडविणारा सोहळा आहे. भगवान बालाजी महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हा उत्सव संपन्न झाला.

Check Also

गोपाळकाला आनंदोत्सव व समाधानाचे प्रतीक -ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज वालूरकर

सेलू,दि 18 (प्रतिनिधी)ः सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र वालूर येथे वै. प. पु. ह.भ.प.अण्णासाहेब महाराज वालूरकर यांच्या …