हिंगोली :
दिवाळी म्हटले की रोषणाई, फराळ, आनंद आणि उत्साहाचे वातावरण सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, समाजातील कष्टकरी आणि श्रमजीवी घटकांच्या आयुष्यातही आनंदाची ज्योत पेटावी, या सामाजिक भावनेतून माजी जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांनी यंदाची दिवाळी एका शेतमजूर (सालगडी) कुटुंबासोबत त्यांच्या साध्याशा झोपडीत साजरी केली.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात राबणाऱ्या सालगड्याच्या कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद वाटून घेत त्यांनी समाजातील कष्टकरी वर्गाप्रती आपली संवेदनशीलता व्यक्त केली. यावेळी त्यांनी शेतमजूर कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद त्यांच्यासोबत साजरा केला.
शेतात दिवसरात्र कष्ट करणारा शेतमजूर हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अनेकदा सण-उत्सवाच्या आनंदापासून हाच घटक दूर राहतो. अशा कुटुंबांच्या झोपडीपर्यंत जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला.”दिवाळीचा खरा आनंद महागड्या रोषणाईत नसून, गरजू आणि कष्टकरी माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंद पोहोचला पाहिजे,” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
Shabdraj www.shabdraj.com