प्रतिनिधी | ०९ नोव्हेंबर
दिवाळीचा सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. सण-उत्सवाच्या काळात जेव्हा सगळे आपापल्या घरी आनंद साजरा करत असतात, अशा वेळी ऊसतोड कामगारांच्या मुलांसोबत फडावर जाऊन दिवाळी साजरी करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे या सामाजिक बांधिलकीचे भान जपत, ‘संकल्प मानव विकास संस्थेच्या’ वतीने ऊसतोड कामगारांच्या फडावर जाऊन त्यांच्या मुलांसोबत दिवाळीचा सण अत्यंत आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
कडक ऊन, धूळ आणि अपार कष्ट उपसणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना सहसा सण-उत्सवाचा आनंद मिळणे कठीण असते. ही वस्तुस्थिती ओळखून संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यकर्त्यांनी थेट कामगारांच्या फडावर पोहोचून तेथील बालकांना एकत्र केले. यावेळी या चिमुकल्यांना दिवाळीनिमित्त गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
आपल्यासोबतही कोणीतरी दिवाळीचा आनंद साजरा करत आहे आणि आपुलकीने विचारपूस करत आहे, या भावनेने मुलांच्या व कामगारांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. या उपक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.
याप्रसंगी बोलताना संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “दिवाळीचा खरा अर्थ इतरांच्या आयुष्यातील अंधार दूर करून तिथे आनंदाचा प्रकाश निर्माण करणे हा आहे. ऊसतोड कामगारांची मुले सणाच्या आनंदापासून वंचित राहू नयेत, हाच आमचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.” या अनोख्या उपक्रमाबद्दल ऊसतोड कामगारांनी संस्थेचे आभार मानले आहेत.
Shabdraj www.shabdraj.com