दोन्ही राष्ट्रवादीचे (NCP) विलिनीकरण हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली आहे. त्यामुळे, येत्या 28 जानेवारीच्या पहिल्या स्मृतिदिनाआधी दादांच्या एकत्रीकरणाचं स्वप्न पूर्ण व्हावं, असे राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. अमोल मिटकरी यांनी सातत्याने अजित पवारांच्या निधनाच्या चौकशीची मागणी केली असून हा घातपात असल्याचं संशय त्यांनी व्यक्त केलाय. आता, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.
राज्यात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. यापूर्वी, खासदार तथा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी, विलिनीकरणाची चर्चा आमच्याकडून तरी संपुष्टात आल्याचं म्हटलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांसोबत सुरू असलेल्या भेटीगाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत झालेली चर्चा, त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा वेगाने सुरू आहे. त्यातच, आता दोन ते अडीच महिन्यांनी अजित पवारांचा प्रथम स्मृतीदिन येत आहे. मात्र, त्यापूर्वीच हे विलिनीकरण व्हावे, अशी इच्छा अमोल मिटकरींनी व्यक्त केलीय.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, त्यामुळे 28 जानेवारीला दादांच्या पहिल्या स्मृतिदिनाआधी दादांचं एकत्रीकरणाचं स्वप्न पूर्ण व्हावं, अशी इच्छा अमोल मिटकरी यांनी अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्राला लवकरच ‘गुड न्यूज’ मिळेल असंही ते म्हणालेत. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर सूचक वक्तव्य करताना मिटकरी यांनी “आगे आगे देखीये, होता है क्या” असं म्हटलं. विलिनीकरणाच्या निर्णयासंदर्भात आमचा संपूर्ण पक्ष सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीर आहे. सुनेत्रा वहिनी म्हणतील तेच पक्षाचे ‘धोरण आणि त्या बांधतील तेच तोरण’ असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मत आहे, असेही त्यांनी म्हटले.
Shabdraj www.shabdraj.com