14/11/26
Breaking News

‘विलीनीकरणाला फुलस्टॉप…’खासदार सुप्रिया सुळे यांनी केला सर्वात मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या विलीनीकरणाच्या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती, अगदी तारीखही ठरली होती. पण ज्या दिवशी दादा गेला, त्या दिवशी माझ्या मनात आणि पक्षामध्ये या विलीनीकरणाला कायमचा ‘फुलस्टॉप’ मिळाला आहे,” असे स्पष्ट विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

‘विलीनीकरणाला फुलस्टॉप…’

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या दिवशी माझ्या भावाचे, माझ्या संघटनेतील मोठ्या पदाधिकाऱ्यांचे आणि दादांचे बोलणे झाले होते… माझा भाऊ होता तोपर्यंत हो, विलीनीकरणाची चर्चा नक्कीच होती. अगदी तारीखही ठरली होती. हे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी सांगितले आहे. पण ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलीनीकरणाबद्दल माझ्या मनात, माझ्या अंतःकरणात आणि आमच्या पक्षामध्ये कायमचा ‘फुलस्टॉप’ लागला.”

‘आमच्याकडून एकही स्टेटमेंट आलेले नाही’

सुप्रिया सुळे म्हणाल्या, विलीनीकरणाचा विषय थांबल्यानंतर आठ वर्षांचा डेटा काढा, एआय मध्ये टाका, चॅटजीपीटी मध्ये शोधा; आमच्याकडून यावर एकही स्टेटमेंट आलेले नाही. आमचा एकही प्रवक्ता गेल्या अनेक महिन्यांत या विषयावर बोललेला नाही. अजित पवार गटाकडून जे जे स्टेटमेंट्स आलेले आहेत, त्याला आम्ही कधीही काऊंटर केलेले नाही.”

देशापुढील आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

या राजकीय चर्चांपेक्षा देशासमोरील ज्वलंत प्रश्नांवर आपल्याला अकाऊंटेबल धरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “या देशात महागाईचे मोठे आव्हान आहे. जगातील इंधनाचे दर, अमेरिकेतील राजकीय बदल, याचा भारतावर काय परिणाम होईल, वन नेशन वन इलेक्शन, अशा मोठ्या पॉलिसी मेकिंगच्या कामांवर जर तुम्ही मला प्रश्न विचारले, तर मला मनापासून आनंद होईल,” असेही त्या म्हणाल्या.

‘चॅनेल्सचा आणि माझा टीआरपी घालवू नका’

आज सकाळी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. म्हणाल्या, मी परवा दिल्लीतही यावर बोलले. आज मी पुन्हा तेच रिपीट करत आहे. माझी हात जोडून विनंती आहे की यानंतर परत-परत तेच प्रश्न विचारू नका. मी पुन्हा तेच उत्तर दिले तर तुम्ही तुमच्या चॅनेलचा पण टीआरपी घालवाल आणि माझाही घालवाल.”

सुप्रिया सुळे यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या सध्याच्या सर्व राजकीय चर्चांना सध्यातरी कायमचा पूर्णविराम मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे

Check Also

आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल!

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत …