14/11/26
Breaking News

ग्रामीण युवकांना ड्रोनचे प्रशिक्षण,वाचा कुठे आणि कसे मिळणार

परभणी,दि.14
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लक्षित गटासाठी 10 दिवसीय निवासी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणास 24 नोव्हेंबरपासून परभणी येथे प्रारंभ होणार आहे.

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सध्या विविध क्षेत्रांत झपाट्याने वाढत आहे. शेतीमध्ये कीटकनाशकांची फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी तसेच विविध शासकीय प्रकल्पांचे निरीक्षण अशा अनेक कामांसाठी ड्रोनचा प्रभावी वापर केला जात आहे. या वाढत्या वापरामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणी आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत.

ही बदलती गरज लक्षात घेऊन अमृत संस्थेने ड्रोन मिशन हाती घेतले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना, विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना, आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या निवासी प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था अमृत संस्थेमार्फत विनामूल्य करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे कौशल्य प्रशिक्षणापासून वंचित राहणाऱ्या पात्र युवकांनाही या संधीचा लाभ घेता येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर स्वतःचा ड्रोन खरेदी करून व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना अमृत संस्थेच्या कर्ज व्याज परतावा योजनेचाही लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळे प्रशिक्षणासोबतच भविष्यात उद्योजकतेकडे वाटचाल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक युवकांनी अमृत जिल्हा कार्यालय परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.

Check Also

आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल!

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत …