26/11/26
Breaking News

परभणी जिल्हा परिषदेत खळबळ; शिक्षकासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोन्सीकर ACB च्या ताब्यात

थकीत वेतनाच्या १५ टक्क्यांची मागणी

परभणी : पत्नीचे थकीत वेतन मंजूर करून देण्यासाठी १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील प्रतिनियुक्तीवरील कला शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. २६) रंगेहात पकडले. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहायक आयुक्त (दिव्यांग सक्षमीकरण) संदीप घोन्सीकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

 

शेख असलम शेख रज्जाक (वय ४३) असे पकडण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या पत्नीस एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील १२ लाख ४६ हजार ४९८ रुपये थकीत वेतन मंजूर झाले होते. सदर रक्कम अदा करण्यासाठी शेख असलम यांनी थकीत वेतनाच्या १५ टक्के म्हणजेच १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १७ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

 

 

या तक्रारीची २० नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी शेख असलम यांनी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी परभणी बसस्थानक परिसरातील मिलन ऑप्टिकलसमोर सापळा रचण्यात आला. यावेळी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास शेख असलम यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

 

 

पुढील चौकशीदरम्यान शेख असलम यांनी ही रक्कम आपले वरिष्ठ अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांच्यासाठी स्वीकारल्याचे पंचांसमक्ष सांगितले. त्यानंतर त्यांनी घोन्सीकर यांना फोन करून पैसे स्वीकारल्याची माहिती दिली व रक्कम कुठे आणून द्यायची, अशी विचारणा केली. त्यावर घरी घेऊन येण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असून, कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किशोर तरोणे व त्यांच्या पथकाने केली.

लाच मागितल्यास तक्रार करा

शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

बँकेच्या ऑनलाईन घोळात शेतकरी कर्जमाफी पासून वंचित, जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार

सेलू (प्रतिनिधी ) बँकेकडून करण्यात आलेल्या ऑनलाईन च्या घोळात सेलू येथील शेतकरी बापूसाहेब रामराव शेरे …