राज्याची लाईफलाइन असलेल्या एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरातील तिकिट दिले जात नाही. प्रवाशांना थेट पूर्ण रक्कम देऊन तिकीट घ्यावे लागत आहे. त्यामुळे एसटी चालक आणि प्रवाशांमध्ये खटके उडत आहेत. आता, एनसीएमसी कार्डबाबत आणखी बातमी समोर आली आहे. प्रवशांनी १०० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना पूर्ण पैसे मिळत नसल्याचे समोर आले आहे. एनसीएमसी कार्ड रिचार्जसाठी एसटी वाहक आणि खासगी ऑपरेटर असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.
एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचा लाभ देण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) अनिवार्य केले आहे. या कार्डशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरातील तिकिट दिले जात नाही. कार्ड नसलेल्या सवलतीस पात्र असणाऱ्या प्रवाशांना थेट पूर्ण रक्कम देऊन तिकीट घ्यावे लागत आहे. अशातच आता आणखी एक घोळ समोर आला आहे. एनसीएमसी कार्ड हे प्रवाशांच्या सोयीपेक्षा खिशालाच जास्त कात्री लागत असल्याचे समोर आले आहे. या कार्डच्या रिचार्जवर एजंटला द्याव्या लागणाऱ्या ‘मर्चंट डिस्काउंट रेट’शुल्काचा अतिरिक्त भार थेट प्रवाशांवर ढकलला जात असल्याने एसटी प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.एनसीएमसी कार्डसाठी निविदा काढताना सेवा पुरवठादाराकडून एजंटला ‘एमडीआर’ शुल्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मूळ नियमानुसार, डिजिटल व्यवहारांसाठी व्यापारी किंवा सेवा पुरवठादार संस्थेने हे शुल्क बँक किंवा पेमेंट नेटवर्कला देणे अपेक्षित असते. परंतु, एसटीच्या या योजनेत हे शुल्क थेट सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशातून का वसूल केले जात आहे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे मेट्रो सेवांमध्ये एनसीएमसी कार्ड वापरताना किंवा रिचार्ज करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही, मग एसटी प्रवाशांवरच हा भुर्दंड का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.एजंटकडून रिचार्ज केल्यास प्रवाशांच्या खिशावर अधिक भार पडतो. प्रवाशाने १०० रुपयांचा टॉपअप केल्यास कार्डमध्ये केवळ ८६.१४ रुपयेच जमा होतात. म्हणजेच जवळपास १३.८६ रुपये ‘एमडीआर’च्या नावाखाली परस्पर कापले जातात. एसटी वाहकाकडून रिचार्ज केल्यास १०० रुपयांचा रिचार्ज केल्यास कार्डमध्ये ९८ रुपये शिल्लक मिळतात. वाहकाला एसटीचा कर्मचारी असल्याने एजंटप्रमाणे कमिशन द्यावे लागत नसले, तरी गेटवे चार्जेसच्या नावाखाली २ रुपये प्रवाशांकडूनच वसूल केले जात आहेत. मात्र, एजंटच्या तुलनेत अवघ्या दोन रुपये कमी होतात.
Shabdraj www.shabdraj.com