31/08/26
Breaking News

12 तारखेपर्यंत मुंबईत जा,पण…..मनोज जरांगे यांनी सांगीतली आंदोलनाची दिशा

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. “आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसांनी नेलं तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील बोलले. मुंबईत कसं जायचं, कुठे रहायचं त्याचा प्लानही त्यांनी सांगितला. “मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख संख्या होईल” असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. “12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14, 15, 16, 17, 20, 12 ते 20 सप्टेंबरपर्यंत परवानगी काढा. मुंबईत पाहुणे, मित्रमंडळींकडे रहा. आझाद मैदान, वर्षावर जाऊ नका” संशय येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट करत, आपण कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नसून थेट मुंबईलाच येणार असल्याची मोठी घोषणा जरांगे यांनी केली आहे. सर्व मराठा बांधवांनी मुंबईत विभागून राहिल्यानंतर, आझाद मैदान, इतर कोणतेही मैदान किंवा थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यापैकी नेमके कुठे जमायचे, याचा निरोप मी स्वतः तुम्हाला देईन. तो निरोप मिळताच सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्र यायचे आहे, अशी रणनीती जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.

12 तारखेच्या दोन-चार दिवस अगोदर हळूहळू तुम्हाला पुढे जाता येईल. उगाच घोळ घालू नका. एकदा का 12 तारखेला दोन-चार दिवस राहिले की, हळूहळू मुंबईकडे जा. मित्राकडे रहा. पोलिसांनी नेलं तर खुशाल पोलीस स्टेशनला जा, टेन्शन घेऊ नका” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “पुढे जाताना गाडीला झेंडा बांधून जाऊ नका. झेंडा बांधून जायचं नाही. हळूहळू घुसा, दोन-चार दिवस आधी. पाच-सहातारखेपासून हळूहळू पुढे जा. सगळ्यांनी माझ्यासोबत येऊ नका. पोलिसांना त्रास द्यायचा नाही. एकनाथ शिंदे, फडणवीसांकडे बघायचय आपल्याला. पोलिसांना त्रास द्यायचा नाहीय.आलं का ध्यानात, उगाच टाइमपास करु नका. दोन-चार दिवस आधी मुंबईकडे निघा” असं आवाहन जरांगे पाटील यांनी समर्थकांना केलं.

दरम्यान, उपोषणस्थळी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम राठोड व त्यांच्या पथकाने जरांगे यांची तपासणी केली. तपासणीत त्यांची शुगर कमी झाल्याचे समोर आल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावण्याचा सल्ला दिला. मात्र, जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यानंतर दुपारी आणि सायंकाळी गेलेल्या वैद्यकीय पथकालाही त्यांनी माघारी पाठवले. सध्या त्यांचा रक्तदाब, नाडीचे ठोके आणि ऑक्सिजनची पातळी स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला जाण्याची शक्यता; तोडग्यासाठी हालचालींना वेग

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीकडे सरकारचे लक्ष आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या चर्चेनंतरही आंदोलन सुरूच असल्याने सरकारकडून पुढील चर्चेसाठी हालचाली सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या भेटीत काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.

आंतरवालीत जनसागर आणि राजकीय पाठिंबा

उपोषणाच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचे लोंढे सतत दाखल होत आहेत. जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. “विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय म्हणतात हा त्यांचा प्रश्न, पण माझा जरांगेंना पाठिंबा आहे,” असे सांगत काळे यांनी आपल्याच नेत्यांना घरचा आहेर दिला. याशिवाय बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही भेट घेतली. यशवंत संघर्ष सेनेने वडीगोद्री ते अंतरवाली अशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात रॅली काढत जरांगे पाटील यांना पारंपरिक काठी व घोंगडी देऊन जाहीर पाठिंबा दिला.

Check Also

पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

हिंगोली शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. …