सेलू न्यायालयाचा धनादेशाच्या दुप्पट रकमेची नुकसान भरपाई देण्याचा आदेश
सेलू / प्रतिनिधी : धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणातील दोन स्वतंत्र खटल्यांमध्ये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सेलू येथील मा. न्यायाधीश गौरव अ. तराळ यांनी आरोपीस दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, संबंधित धनादेशांच्या दुप्पट रकमेची नुकसानभरपाई फिर्यादीस एका महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल दि. २२ जुलै २०२६ रोजी देण्यात आला.
प्रकरणातील माहितीनुसार, भिकमचंद श्रीमल गादिया यांना हिरा टिकमचंद परदेशी यांनी हातउसने घेतलेल्या ₹५० हजारांच्या परतफेडीसाठी ₹४० हजार आणि ₹१० हजार असे दोन धनादेश दिले होते. मात्र, आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे दोन्ही धनादेश अनादर (बाऊन्स) झाले.

यानंतर फिर्यादी भिकमचंद गादिया यांनी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सेलू न्यायालयात एस.एस.सी. क्र. २५३/२०१६ व एस.एस.सी. क्र. २५४/२०१६ या दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दि. १७ नोव्हेंबर २०१६ रोजी आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली होती.
सुनावणीदरम्यान फिर्यादी व आरोपी यांच्या साक्षी, पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले.
एस.एस.सी. क्र. २५३/२०१६ या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणून ₹८० हजार नुकसानभरपाई एका महिन्याच्या आत फिर्यादीस अदा करण्याचे आदेश दिले. ही रक्कम निर्धारित मुदतीत न भरल्यास एक महिन्यांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच मुख्य शिक्षेअंतर्गत दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
तसेच एस.एस.सी. क्र. २५४/२०१६ या प्रकरणात आरोपीस ₹२० हजार नुकसानभरपाई एका महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश देण्यात आले. ही रक्कम न भरल्यास एक महिन्यांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा तसेच मुख्य शिक्षेअंतर्गत दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात फिर्यादी भिकमचंद श्रीमल गादिया यांच्या वतीने ॲड. एल. एच. खोना यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
Shabdraj www.shabdraj.com