मुंबई – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिजीत दिपके आणि देशभरातील सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन. आंदोलनाला निर्भयपणे पाठिंबा देणाऱ्या पालकांचेही त्यांनी आभार मानले.

ते पुढे म्हणाले, “हा विषय केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नाही. गेल्या अनेक वर्षांपासून देशातील जनतेवर विविध प्रकारचा दबाव निर्माण होत असल्याची भावना होती. या आंदोलनाच्या माध्यमातून तरुणांनी लोकशाही पद्धतीने आपला आवाज बुलंद केला असून, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही जनभावनांची दखल घ्यावी लागली.”
उद्धव ठाकरे यांनी पुढे असेही म्हटले की, “देशातील तरुणांनी भीतीचे वातावरण झुगारून देत लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष केला. हा केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे, तर संपूर्ण देशातील युवकांचा विजय आहे.”
“तरुणाईचा मोठा विजय” – राज ठाकरे
राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत आंदोलनाचे कौतुक करत विजय सोहळ्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “शिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ उभारण्यात येणार असून, तेथे सर्वजण एकत्र येणार आहोत. हा देशातील तरुणाईचा मोठा विजय आहे.”
ते पुढे म्हणाले, “इतक्या मोठ्या प्रमाणावर देशभर आंदोलन उभे राहिले आणि त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. हा विजय साजरा झाला पाहिजे. या आंदोलनात अभिजीत दिपके यांचे योगदान महत्त्वाचे आहे.”
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले, “यापुढे आंदोलनाबाबत किंवा पुढील कार्यक्रमाबाबत जो निर्णय अभिजीत दिपके घेतील, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. ही चळवळ त्यांनी सुरू केली असून, पुढील दिशा ठरवण्याचा अधिकारही त्यांचाच आहे.”
“पुढच्या आंदोलनाची दिशा अभिजीत दिपके ठरवतील”
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुढील आंदोलनाबाबतही सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, “पुढच्या आंदोलनाची दिशा अभिजीत दिपके ठरवतील. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र सध्या संपर्क होऊ शकलेला नाही.”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढील राजकीय आणि सामाजिक घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shabdraj www.shabdraj.com