Do smart meters cause bills to increase?
मुंबई – राज्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक वाढ झाल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे ही वाढ स्मार्ट मीटरमुळेच होत असल्याचा समज सर्वसामान्यांमध्ये पसरला आहे. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत स्मार्ट मीटर नव्हे, तर वाढलेला वीज वापर आणि राज्यातील ‘टेलिस्कोपिक’ वीजदर रचना यामुळे बिल वाढत असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत 1 कोटी 23 लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यापैकी 3 लाख 92 हजार ग्राहकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची तपासणी केल्यानंतर केवळ 210 तक्रारींमध्येच तथ्य आढळून आले.
त्यांनी पुढे सांगितले की, स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना दिवसा वीज वापरावर काही प्रमाणात सवलतीचाही लाभ मिळतो. त्यामुळे भरमसाठ वीजबिल येण्यामागे स्मार्ट मीटर जबाबदार नसून, वाढलेला वीज वापर, उष्णतेची लाट आणि बदलते हवामान यामुळे एसी, कूलर, पंखे आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने वीजबिलात वाढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील ‘टेलिस्कोपिक’ वीजदर पद्धतीची माहिती दिली. या पद्धतीनुसार विजेचा वापर वाढत जाईल तसा प्रति युनिट आकारला जाणारा दरही टप्प्याटप्प्याने वाढतो.
सरकार 300 युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी तुलनेने कमी दर आकारते. मात्र, 300 युनिट्सची मर्यादा ओलांडताच प्रति युनिट दरात सुमारे 5 रुपयांची वाढ होते. त्याचप्रमाणे 500 युनिट्सच्या पुढे वापर गेल्यास प्रति युनिट दरात आणखी सुमारे 2 रुपयांची वाढ लागू होते.
मुख्यमंत्र्यांनी उदाहरण देत सांगितले की, 1 BHK घरात 300 युनिट्सऐवजी 415 युनिट्स आणि 2 BHK घरात 500 युनिट्सऐवजी 655 युनिट्स वीज वापर झाल्यास ग्राहक उच्च दराच्या स्लॅबमध्ये जातात. त्यामुळे केवळ काही युनिट्स वाढल्यामुळे नव्हे, तर प्रति युनिट दर वाढल्याने एकूण वीजबिल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.
यामुळे स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढत असल्याचा समज चुकीचा असून, प्रत्यक्षात वाढलेला वीज वापर आणि टेलिस्कोपिक वीजदर रचना हेच बिल वाढण्यामागील प्रमुख कारण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Shabdraj www.shabdraj.com