Maharashtra Weather Update News
मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावत मान्सूनने जूनमधील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून काढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा फार काळ टिकण्याची शक्यता नसून, राज्यात मान्सूनच्या प्रवासाला पुन्हा एकदा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १० ते १५ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये उकाडा वाढू लागला आहे. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने नागरिकांना प्रचंड उष्णतेचा त्रास जाणवत आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, रायगड आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणात दमटपणा वाढला आहे. येत्या आठवड्यात मुंबई परिसरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, कोकण विभागातही तापमानात वाढ नोंदवली जात आहे. डहाणू आणि अलिबाग येथे ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अलिबागमध्ये सरासरीपेक्षा ३.३ अंश, तर डहाणूमध्ये २.७ अंशांनी तापमान अधिक नोंदवले गेले.
मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चढू लागला असून सोलापूर येथे शुक्रवारी ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भात सर्वाधिक उष्णतेची नोंद चंद्रपूर येथे ३६ अंश सेल्सिअस इतकी झाली असून, हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ४ अंशांनी अधिक आहे.
‘एल निनो’चा मान्सूनवर परिणाम
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात ‘एल निनो’ (El Niño) पुन्हा सक्रिय झाला असून, त्याचा परिणाम मान्सूनच्या गतीवर होत आहे. याशिवाय अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्याने मान्सूनला पोषक परिस्थिती निर्माण होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील पावसाची तीव्रता कमी होऊन १० ते १५ जुलैदरम्यान पावसामध्ये लक्षणीय खंड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता असून, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
Shabdraj www.shabdraj.com