रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी
गंगाखेड शहरातील भगवती मंदिर कॉर्नर परिसरात मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) रात्री कार आणि ऑटो यांच्यात झालेल्या अपघातात ऑटोचालक लखन नामदेवराव वायसे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती आहे.
तक्रारीतील माहितीनुसार, रोशन मोहल्ला येथील रहिवासी लखन वायसे हे ऑटो क्रमांक एमएच २२ एफ २३४८ ने रात्री सुमारे १०.१० वाजता घरी जात होते. त्यावेळी बसस्थानकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या इर्टिगा कार क्रमांक एमएच २२ बीसी ७६१७ ची त्यांच्या ऑटोला भगवती मंदिर कॉर्नरजवळ धडक बसली. या अपघातात ऑटोचे नुकसान झाले, तर लखन वायसे गंभीर जखमी झाले.
जखमी वायसे यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर संबंधित कार घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील वाहनचालकाची ओळख निश्चित करून अपघाताची चौकशी करावी आणि तपासात निष्पन्न होणाऱ्या तथ्यांनुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार राम नामदेवराव वायसे यांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे वायसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Shabdraj www.shabdraj.com