16/10/26
Breaking News

उत्सव २०२६ दांडिया महोत्सवाचा आजपासून जल्लोषात शुभारंभ!

हिंगोली : उत्सव फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘उत्सव २०२६ डांडिया महोत्सवा’चा आज, बुधवार दि. १४ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शुभारंभ होत आहे. दि. १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या या पाच दिवसीय महोत्सवात डांडिया नृत्य, आकर्षक वेशभूषा, विविध विशेष पुरस्कार आणि पारंपरिक संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘ऑरेंज ट्रेडिशन’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, महिला सदस्य भगव्या रंगाच्या साड्या, तर पुरुष सदस्य पांढरे कुर्ते परिधान करणार आहेत. मैदानावर महिला सदस्यांना भगव्या रंगाची चुनरी देण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी राजस्थानी शाही वेशभूषा, तिसऱ्या दिवशी बॉलीवूड नाईट, चौथ्या दिवशी फ्युजन फिएस्टा, तर रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी पारंपरिक दिन साजरा करण्यात येणार आहे.

महोत्सवात दररोज बालकांसाठी तीन, जोडप्यांसाठी एक आणि महिलांसाठी एक अशा पाच विशेष पुरस्कारांची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये लिटिल डांडिया स्टार, रायझिंग गरबा चॅम्पियन, लिटिल महाराजा/महाराणी, उत्सव परफेक्ट जोडी आणि डांडिया क्वीन ऑफ उत्सव यांसारख्या आकर्षक पुरस्कारांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक दिवसाच्या संकल्पनेनुसार उत्कृष्ट वेशभूषेसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये ऑरेंज एलिगन्स, रॉयल राजवाडा लूक, बॉलीवूड ग्लॅम स्टार, फ्युजन फॅशन आयकॉन आणि परंपरा प्राईड या पुरस्कारांचा समावेश असेल.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष राजेश बागडिया आणि सोनल कांदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य समिती परिश्रम घेत आहे. मुख्य समितीमध्ये प्रवीण सोनी, मुरली हेडा, मधुर भन्साळी, ओम नेनवानी, मयूर सोनी, सुनील बागडिया आणि डॉ. श्रीधर कांदी यांचा समावेश आहे. तसेच उत्सव समितीचे सर्व सदस्य आयोजनासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

डांडिया महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, हा आयोजकांचा उद्देश आहे. हिंगोलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या भव्य उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष, मुख्य समिती आणि उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

पत्रकार क्रिकेट स्पर्धेची तयारी पूर्ण,सोमवारी होणार क्रिकेट स्पर्धेच्या लोगोचे अनावरण

हिंगोली,दि 11 ः सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, हिंगोली पत्रकार क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या …