04/02/26
Breaking News

नाट्य स्पर्धेत बळीराजा विद्यालयाचा तालुक्यात प्रथम क्रमांक

परभणी,दि 27 ः
गगाखेड तालुक्यात दिनांक 25 सप्टेंबर रोजी विज्ञान नाटिका स्पर्धा उत्साहात पार पडल्या. तालुकाभरातील अनेक शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जनाबाई विद्यालय गंगाखेड, बळीराजा विद्यालय मरडसगाव, जिल्हा परिषद शाळा पिंपळदरी, कस्तुरबा गांधी विद्यालय गंगाखेड, अक्षरनंदन विद्यामंदिर गंगाखेड आदी शाळांनी आपली नाटिका सादर केली.

महाराष्ट्र शासन समग्र शिक्षण अभियानांतर्गत गटसाधन केंद्र व अक्षरनंदन विद्यामंदिर गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञानाशी निगडित विविध विषय जसे की विज्ञानातील महिला, स्मार्ट शेती, डिजिटल भारत सक्षमीकरण, सर्वांसाठी स्वच्छता, हरित तंत्रज्ञान हे नाटिकांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक बळीराजा विद्यालय मरडसगाव यांनी पटकावला. गोपी मुंडे लिखित व दिग्दर्शित “आम्ही विज्ञाननारी” या नाटकातून श्रावणी कांबळे, गायत्री बोबडे, सुप्रिया रॅपल, पूजा अडकिने, पुनम कांबळे व विद्या शिंदे या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. द्वितीय क्रमांक अक्षरनंदन विद्यामंदिर गंगाखेड रुद्रा मुरकुटे मार्गदर्शनाखाली यांना तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा पिंपळदरी (मुंढे मॅडम मार्गदर्शनाखाली यांना मिळाला.

या वेळी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. अविनाश कासांडे सुप्रसिद्ध कवी, गझलकार व हिंदी विभागप्रमुख, पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालय, सिरसाळा, ता. परळी, जि. बीड तसेच प्रा. भालेराव सर संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड यांनी काटेकोर परीक्षण करून आपली जबाबदारी पार पाडली.

गटसाधन केंद्राचे केंद्रे , अक्षरनंदन शाळेचे श्री. कदम सर यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या यशस्वी आयोजनासाठी अक्षरनंदन विद्यामंदिरच्या सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले. विज्ञानावर आधारित या तालुकास्तरीय नाटिका स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विद्यार्थ्यांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे. बळीराजा विद्यालयाचे मुख्याध्यापक,  अशोकराव कोरडे , संस्थाध्यक्ष सुनील जाधव केरवाडीकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …