रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून (मेडिकल) खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठा दणका दिला आहे. “रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणे कायद्याने बंधनकारक नाही. औषधे कुठून खरेदी करायची, हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा अधिकार आहे,” असा महत्त्वपूर्ण आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
‘औषध खरेदी’ हा रुग्णाचा कायदेशीर अधिकार
पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, “बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे अशा तक्रारी येतात आणि माहिती मिळते की, हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट असेल, तर त्याला लागणारी औषधे त्याच हॉस्पिटलच्या फार्मसीमधून घेण्याची सक्ती केली जाते. परंतु, कायद्यानुसार कोणतीही संस्था किंवा रुग्णालय रुग्णांना अशी सक्ती करू शकत नाही. बाहेरून औषधे आणणे हा रुग्णाचा वैयक्तिक चॉईस आहे. तुम्ही कोणावरही सक्ती करू शकत नाही. औषध कुठून खरेदी करायचे, हा नागरिक आणि पेशंटचा मूलभूत अधिकार आहे.”
रुग्णालयांच्या ‘मोनोपॉली’ला आणि मनमानी नफेखोरीला ब्रेक
अनेक बड्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये स्वतःच्या अंतर्गत फार्मसी चालवल्या जातात. अनेकदा रुग्णालयाबाहेर किंवा इतर मेडिकल स्टोअर्समध्ये तीच औषधे सवलतीच्या दरात किंवा जेनेरिक स्वरूपात उपलब्ध असतात. मात्र, रुग्णालय प्रशासन अंतर्गत छुप्या नियमांचा हवाला देऊन रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणू देत नाही, अशा अनेक तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या. मुंढे यांच्या या नव्या आदेशामुळे रुग्णालयांच्या या एकाधिकारशाहीला आणि मनमानी नफेखोरीला पूर्णपणे ब्रेक लागणार असून, सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबण्यास मदत होणार आहे.
डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन द्यावेच लागणार
मुंढे यांनी स्पष्ट केले की, रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णाला लागणाऱ्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन नातेवाइकांच्या हातात देणे बंधनकारक राहील. ते प्रिस्क्रिप्शन घेऊन नातेवाइकांना त्यांच्या सोयीनुसार आणि परवडणाऱ्या दरानुसार कोणत्याही बाहेरील नोंदणीकृत मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. जर एखाद्या औषधाचा विशिष्ट ब्रँड उपलब्ध नसेल, तर रुग्ण बाहेरील मेडिकलमधून उपलब्ध असलेले जेनेरिक पर्यायही निवडू शकतात.
आदेश डावलल्यास एफडीएकडून थेट कारवाईचा इशारा
हा केवळ सल्ला नसून अधिकृत शासकीय आदेश असल्याचे स्पष्ट करत आयुक्तांनी सांगितले की, सर्व रुग्णालयांनी या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. जर कोणत्याही रुग्णालयाने रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना त्यांच्याच फार्मसीमधून औषधे घेण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भाग पाडले, तर नागरिक याविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) थेट तक्रार नोंदवू शकतात. अशा प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधित रुग्णालयाविरोधात कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही तुकाराम मुंढे यांनी दिला.
Shabdraj www.shabdraj.com