17/07/26
Breaking News

हिंगोली खरेदी-विक्री संघावर भाजप प्रणित पॅनेलचा एकहाती विजय

हिंगोली (प्रतिनिधी):
हिंगोली तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि स्थानिक महायुती पुरस्कृत पॅनेलने एकहाती सत्ता काबीज करत एकहाती विजय मिळवला आहे. निवडणुकीच्या एकूण १५ जागांपैकी १० जागांवर पक्षाने आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. तर उर्वरित जागांच्या मतमोजणीत आज भाजप प्रणित पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून विरोधकांचा सुपडा साफ केला. या शानदार यशानंतर आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी सर्व विजयी उमेदवारांचा जाहीर सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने सुरुवातीपासूनच आपले जोरदार वर्चस्व कायम ठेवले होते. यापूर्वीच या पॅनेलचे नारायण इंगोले, विठोबा मुटकुळे, माणिक लोडे, भानुदास वामन, सदाशिव थोरात आणि रमेश चौधरी हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
आज पार पडलेल्या अधिकृत मतमोजणीच्या अंतिम निकालानुसार, उमेश नागरे, निखिल बांगर, सौ. किरण बर्वे आणि सौ. सरस्वती जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष केला.
या विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभाप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव थोरात, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे आणि ज्येष्ठ नेते के.के. शिंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …