17/07/26
Breaking News

पाणीपुरवठा योजना आढावा बैठक- गंगाखेडकरांना दिलासा देणारी आशादायी घडामोड

गंगाखेड / प्रतिनिधी
शहरातील सततच्या पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक संकेत देणारी बैठक आज पालिकेत पार पडली. नगराध्यक्षा उर्मिला केंद्रे यांच्या दालनात त्यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण, गळती दुरुस्ती, वितरण व्यवस्थापन आणि पुढील काळातील ठोस नियोजन—या सर्व मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट दिशा देण्यात आली.
बैठकीत शहरातील विविध भागांत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, वारंवार होणाऱ्या गळती, वेळापत्रकातील विस्कळीतपणा यावर स्पष्ट चर्चा झाली. “नागरिकांना नियमित व न्याय्य पाणीपुरवठा मिळालाच पाहिजे,” असा ठाम राजकीय संदेश देत कामकाजात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असे नगराध्यक्षा यांनी ठणकावून सांगितले. त्रस्त नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी यंत्रणेला जबाबदारीने काम करावे लागेल, अशी सूचनाही देण्यात आली.
या बैठकीला नगरसेवक व गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे, सुनील चौधरी, अजिज खांन, चंद्रकांत खंदारे, प्रवीण घोबाळे, साबेर शेख यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एकीकडे प्रशासनाची जबाबदारी ठसवणारी राजकीय भूमिका आणि दुसरीकडे वर्षानुवर्षे पाण्यासाठी झगडणाऱ्या नागरिकांचा आक्रोश—या दोन्हींची दखल घेतली गेल्याने गंगाखेड शहरात पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, असा आशावाद नागरिकांत निर्माण झाला आहे. आता या आश्वासनांचे प्रत्यक्षात रूपांतर होते की बहुमत अभावी प्रलंबित राहतं, याकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …