हिंगोली,दि 11 ः
सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, हिंगोली पत्रकार क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे संघ, व्यापाऱ्यांसह विविध संघाच्या क्रिकेट आयोजनाची पूर्वतयारी झाली असून शनिवारी दसरा समितीचे अध्यक्ष समाधान घुतुकडे यांनी प्रत्यक्ष मैदानाची पाहणी केली व स्पर्धा आयोजन बाबत मार्गदर्शन केले.प्रत्यक्षात दि.१२ ऑक्टोबर सोमवार रोजी विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे.
हिंगोली संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे दि. १२ ऑक्टोबर रविवार रोजी करण्यात सकाळी नऊ वाजता मान्यवारांच्या हस्ते पत्रकार क्रिकेट संघ स्पर्धेच्या लोगोचे अनावरण केले जाणार आहे.
तर सकाळी दहा वाजता दृष्टीहिन क्रिकेट संघाचे स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मान्यवराच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश दृष्टीहिन खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे व समाजात समावेशकतेचा संदेश देणे हा आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून दृष्टीहिन क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.CABM च्या नियमानुसार या स्पर्धेत घंटा असलेला विशेष चेंडू वापरला जाणार आहे.या कार्यक्रमास सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे पदाधिकारी, हिंगोली पत्रकार क्रिकेट संघाचे सर्व सदस्य, CABM चे पदाधिकारी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी व प्रत्यक्ष ग्राउंड ची पाहणी करण्यासाठी दसरा समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुतुकडे यांनी दि.११ ऑक्टोबर रविवार रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर दुपारी भेट देऊन आयोजक पत्रकार संघाच्या सदस्यांशी चर्चा करून मार्गदर्शक सूचना केल्या.
दि.१२ते १८ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत पत्रकार क्रिकेट संघ, पोलीस क्रिकेट संघ, महसूल कर्मचारी क्रिकेट संघ, वैद्यकीय अधिकारी क्रिकेट संघ,शिक्षण विभाग क्रिकेट संघ अदि विविध शासकीय निम शासकीय अधिकारी कर्मचारी संघ, केमिस्ट क्रिकेट संघ, व्यापारी संघ यांच्यासह महिला क्रिकेट संघ व दिव्यांगांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजनाची मेजवानी यंदा दसरा उत्सवानिमित्त क्रिकेट प्रेमींना दिल्या जाणार आहे. तेव्हा दररोज होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Shabdraj www.shabdraj.com