गंगाखेड,दि 11 (प्रतिनिधी) :
गंगाखेड येथील केशवनगरमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वाटप शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरात विविध भटके-विमुक्त व वंचित घटकांतील नागरिकांना रहिवासी, राष्ट्रीयत्व आदी आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी युवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, नायब तहसीलदार केंद्रे, डोडल अजीम यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वैदू, डमरे, जोशी, कुडमुडे, नाथ, जोगी आदी समाजांतील नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला.
पात्र नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कागदपत्रांअभावी शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक दस्तऐवज उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
शिबिर झाले; आता नियमित सुविधांचे काय?
एकाच ठिकाणी प्रमाणपत्रे, मतदार नोंदणी व योजनांची माहिती मिळणे हा दिलासा असला, तरी भटके-विमुक्त नागरिकांना प्रत्येक वेळी शिबिराची वाट पाहावी लागू नये. पात्र नागरिकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून नियमित शासकीय यंत्रणेतून वेळेत सेवा मिळते का, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
-*-

Shabdraj www.shabdraj.com