गंगाखेड तालुका प्रतिनिधी – रामप्रसाद ओझा
गंगाखेड शहरातील गोदातटावरील श्री बालाजी मंदिरात सहा-सात शतकांची परंपरा लाभलेला वार्षिक नवरात्रोत्सव ५ ते २५ ऑक्टोबरदरम्यान साजरा होत आहे. ‘प्रति तिरुपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, पालख्या, वाहनांवरील नगरप्रदक्षिणा आणि दसरा रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, पंचक्रोशीतील भाविकांचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे.
उत्सवाच्या प्रारंभी ५ ऑक्टोबर रोजी गणपतीच्या पालखीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली, तर ६ ऑक्टोबर रोजी विड्याची पालखी काढण्यात आली. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना व ध्वजवाहनाचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर श्री बालाजींच्या विविध वाहनांवरील नगरप्रदक्षिणांना प्रारंभ होईल. १२ ऑक्टोबरला नागवाहन, १३ ऑक्टोबरला मोरवाहन आणि १४ ऑक्टोबरला वाघवाहनाची नगरप्रदक्षिणा होणार आहे.
१५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सौभाग्यवती हत्ती आणि सायंकाळी ६ वाजता श्रींची पालखी निघणार आहे. १६ ऑक्टोबरला अंबारी हत्ती, १७ ऑक्टोबरला सकाळी सूर्यवाहन व सायंकाळी चंद्रवाहन, १८ ऑक्टोबरला पुष्पक वाहन, तर १९ ऑक्टोबरला मारुती वाहनाची नगरप्रदक्षिणा होणार आहे.
दसरा रथोत्सव ठरणार मुख्य आकर्षण
२१ ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त सकाळी १० वाजता लहान रथ, दुपारी ३ वाजता मोठा रथ आणि सायंकाळी ६.३० वाजता अर्धवाहन (घोडा) अशी नगरप्रदक्षिणा होणार आहे. या पारंपरिक रथोत्सवात पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी होतात. नवसपूर्तीसाठी रथामागे मोठ्या संख्येने महिला भाविकही उपस्थित राहतात. त्यामुळे दसरा रथोत्सव हा नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
उत्सवाच्या उत्तरार्धात २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रींचे साडे (मंदिरात), २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता गोविंदराज पोशाख, तर २५ ऑक्टोबर रोजी रात्री कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होणार आहे.
उत्सवकाळात दररोज पवमान अभिषेक, तुलसी अर्चना, व्यंकटेश माहात्म्य आणि गंगाळ महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांत आणि दसरा रथोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री बालाजींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट | श्री बालाजी नवरात्रोत्सव : प्रमुख कार्यक्रम
५ व ६ ऑक्टोबर – गणपती व विड्याची पालखी
११ ऑक्टोबर – घटस्थापना व ध्वजवाहन
१२ ते १४ ऑक्टोबर – नाग, मोर व वाघवाहन
१५ व १६ ऑक्टोबर – सौभाग्यवती हत्ती, श्रींची पालखी व अंबारी हत्ती
१७ ते १९ ऑक्टोबर – सूर्य, चंद्र, पुष्पक व मारुती वाहन
२१ ऑक्टोबर – दसरा रथोत्सव : लहान रथ, मोठा रथ व अर्धवाहन
२२ ऑक्टोबर – श्रींचे साडे (मंदिरात)
२३ ऑक्टोबर – गोविंदराज पोशाख
२५ ऑक्टोबर – कोजागिरी पौर्णिमा उत्सवा नंतर सांगता होते.
Shabdraj www.shabdraj.com