16/10/26
Breaking News

संत जनाबाई परिसरातील वटवृक्षाचे पुनर्रोपण;संवर्धनाचे आव्हान कायम

गंगाखेड तालुका प्रतिनिधी – रामप्रसाद ओझा
गंगाखेड शहरातील अदालत रोड ते कोद्री रोड या राज्यरस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान संत जनाबाई महाविद्यालय परिसरातील सुमारे ६० वर्षे जुन्या वटवृक्षाचे पुनर्रोपण करण्यात आले. रस्ते विकासाच्या कामात जुन्या वृक्षांचे अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधकाम विभागाने पुढाकार घेत नियोजित जायकवाडी परिसरात हा वटवृक्ष पुनर्रोपित केला. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि पुनर्रोपणाची वेळ लक्षात घेता या वृक्षाच्या संवर्धनाची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संतविचारातून वृक्षांप्रती असलेली आत्मीयता जपत ही प्रक्रिया राबविण्यात आली. वटवृक्षाचे मूळ व मातीचा आवश्यक भाग सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे दहा फूट खोलीपर्यंत खोदकाम करून वृक्ष हलविण्यात आला. त्यानंतर नियोजित ठिकाणी त्याचे पुनर्रोपण करण्यात आले. जुन्या वृक्षांचे केवळ अस्तित्व संपविण्याऐवजी त्यांना नव्या जागी जगण्याची संधी देण्याचा हा प्रयत्न पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या वेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके, उपअभियंता शिरुरे, प्रा. दयानंद उजळंबे, प्रा. मुंजाजी चोरघडे, माजी नगरसेवक तुकाराम तांदळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. पुनर्रोपणानंतर या वटवृक्षाला पुन्हा नवीन पालवी फुटून तो पूर्ववत बहरावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
विकासासोबत पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात असले, तरी पुनर्रोपण म्हणजे वृक्षसंवर्धनाची अंतिम पूर्तता नव्हे. वृक्ष पुन्हा रुजणे, त्याची मुळे कार्यरत होणे आणि नव्या जागेतील वातावरणाशी जुळवून घेणे या पुढील टप्प्यांवर त्याचे भवितव्य अवलंबून असेल.
चौकट : पुनर्रोपण झाले; आता वृक्ष जगविण्याची जबाबदारी कोणाची?
सुमारे सहा दशकांची सावली देणारा वटवृक्ष नव्या जागी नेऊन लावणे हा पहिला टप्पा आहे; मात्र त्याला पुन्हा बहरण्यासाठी नियमित पाणी, मुळांभोवती योग्य निगा, आवश्यक तांत्रिक देखरेख आणि सातत्यपूर्ण संवर्धन गरजेचे आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता किमान दोन वर्षे नियमित देखभालीचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल.
शासकीय यंत्रणांकडून एखादा उपक्रम राबविला जाणे पुरेसे नाही; त्याच्या परिणामांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. संबंधित विभागाने देखभालीची जबाबदारी निश्चित करावी, तर स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांनीही या वृक्षाच्या जगण्यावर लक्ष ठेवावे. अन्यथा, पुनर्रोपणाचा उपक्रम कागदोपत्री यशस्वी ठरेल; पण प्रत्यक्षात वृक्ष वाचविण्याचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
विकासाच्या रस्त्यावर वृक्षांचे अस्तित्व टिकविणे जितके महत्त्वाचे, तितकेच पुनर्रोपित वृक्षाला पुन्हा जगविणेही महत्त्वाचे आहे.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …