हिंगोली | प्रतिनिधी
गोवंश, गोरक्षण आणि गोहत्या या मुद्द्यांवरून देशात वाढत चाललेले राजकारण, सामाजिक तणाव आणि अप्रिय घटना रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच काऊन्सिल (NGO) हिंगोलीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृतीप्रधान देश असून विविध धर्म, जाती आणि संस्कृतीचे लोक अनेक वर्षांपासून एकत्रितपणे राहत आहेत. भारतीय वेद-पुराण, हिंदू संस्कृती तसेच अनेक धर्मांमध्ये गायीला मातेसमान स्थान देण्यात आले असून “गोमाता” म्हणून तिची पूजा केली जाते.
ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये गाय आणि बैल यांचे मोठे योगदान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गायीचे दूध लहान मुलांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरत असून गोमूत्र व शेणाचा धार्मिक विधी तसेच सेंद्रिय शेतीसाठी वापर केला जातो. बैलांचा शेतीकामासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असल्याने शेतकरी त्यांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतात.
मात्र दुसरीकडे गोहत्या आणि गोरक्षणाच्या मुद्द्यावरून काही ठिकाणी सामाजिक, आर्थिक व राजकीय स्वार्थ साधण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या विषयाला जातीय रंग देऊन समाजात तेढ निर्माण केली जात असल्याने अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि निरपराध लोकांना जीव गमवावा लागत असल्याचेही नमूद करण्यात आले.
यामुळे गोवंशाच्या नावावर होणारे राजकारण आणि समाजातील वाढती दरी थांबवण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शेख नईम शेख लाल (संस्थापक सचिव तथा राष्ट्रीय अध्यक्ष), शेख नौमान नवेद (राष्ट्रीय संचालक), शेख बासीत (जिल्हाध्यक्ष), रवी बन्सीलाल जैस्वाल (जिल्हा उपाध्यक्ष), शेख आवेज, शेख शाहनवाज हुसेन, जी.प्र. महासचिव पठाण साजीद खान (शहराध्यक्ष), सतिश लोणकर, पठाण रऊफ खान, मो. आमेर, मो. परवेज बागबान, शेख मुदस्सीर, पठाण माझ खान यांच्यासह पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com