गंगाखेड (प्रतिनिधी):
शेती हा केवळ व्यवसाय नसून ग्रामीण भारताचा श्वास आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या घामावरच देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. मात्र बदलते हवामान, वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अस्थिरता आणि बनावट निविष्ठांचा वाढता सुळसुळाट यामुळे शेतकरी आज गंभीर संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागातील अधिकारी व कृषी केंद्र चालकांनी केवळ शासकीय फाइल्सपुरते मर्यादित न राहता, शेतकऱ्यांचा विश्वास जपण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असा ठाम सूर डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील मौजे बनपिंपळा येथील त्यांच्या निवासस्थानी कृषी विषयक नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी व कृषी केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. गुट्टे यांनी कृषी विभागाचा सविस्तर आढावा घेत शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
“तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची खत, बियाणे किंवा मार्गदर्शनाच्या नावाखाली फसवणूक होता कामा नये. बनावट खत, निकृष्ट बियाणे आणि चुकीचा सल्ला हे केवळ आर्थिक नुकसान करत नाहीत, तर शेतकऱ्याची स्वप्ने उद्ध्वस्त करतात,” असे सांगत त्यांनी अशा गैरप्रकारांविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका जाहीर केली. दोषींवर थेट गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याचे आदेश देत भरारी पथकांमार्फत अचानक तपासण्या करण्यावर भर देण्याचे निर्देशही दिले.
शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळावा, बाजारभावापेक्षा चढ्या दराने खते-बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि सर्व निविष्ठांचे दर फलक स्पष्टपणे लावले जावेत, यावर आमदारांनी ठाम भूमिका घेतली. “शेतकरी एकटा नाही; अन्यायाविरुद्ध मी स्वतः त्याच्यासोबत उभा आहे,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला.
आज शेतीचे स्वरूप बदलत असून आधुनिक तंत्रज्ञान, हवामानानुसार पीक नियोजन, सेंद्रिय शेती, जलव्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे. कृषी केंद्रे ही केवळ खत-बियाणे विक्रीची ठिकाणे न राहता शेतकऱ्यांची मार्गदर्शन केंद्रे झाली पाहिजेत. अधिकारी, कृषी केंद्र चालक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहिला, तर शेती क्षेत्रात निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वासही आमदार डॉ. गुट्टे यांनी व्यक्त केला.
बैठकीस कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कृषी केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :-
*कार्यालयात शेतकऱ्यांना वेळ नाही, फार्महाऊसवर मात्र हजेरी!
गंगाखेड कृषी अधिकारी कार्यालयात सामान्य शेतकरी व नागरिकांना भेट न देणारे अधिकारी-कर्मचारी, आमदारांच्या फार्महाऊसवरील बैठकीला मात्र तमाम लवाजम्यासह हजर होते.
काल-परवाच कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना भेट न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल तीन-चार तास कुलूप लावून बैठे सत्याग्रह केला होता.
मग प्रश्न असा उभा राहतो की, शेतकऱ्यांसाठी असलेले कार्यालय अधिकारी कधी उघडतील? की शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाचाच मार्ग घ्यावा लागणार आहे?*
Shabdraj www.shabdraj.com