हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे, कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. २१ विज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.याची दखल घेत नवीन विज रोहीत्र देऊन रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
हिंगोली तालुक्यातील कलगाव व भांडेगाव येथे रात्रीच्या विज पुरवठा नसल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत .या प्रश्नावर क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, रमेश जाधव, अशोक जयस्वाल, विशाल पौळ, रावसाहेब घुमनर, अशोक पौळ, भाऊराव पौळ, गजानन पौळ, दामोदर घुमनर, प्रभात पौळ, बबन पौळ, पवन पौळ यांनी आज विज कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे विज कंपनीचे अधिकारी नरमले. अधिकाऱ्यांनी कलगाव व भांडेगाव येथे नवीन ट्रान्सफार्मर बसवून विज पुरवठा सुरळीत केला जाईल तसेच रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर दोन तासांनी ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

Shabdraj www.shabdraj.com