17/07/26
Breaking News

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विरोधीपक्ष कुठे आहे?

रामप्रसाद ओझा | गंगाखेड/प्रतिनिधी
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आज एक प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे — इथे खरंच विरोधीपक्ष किंवा प्रभावी विरोधी नेते उरले आहेत का?
राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील ज्वलंत प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा, रस्त्यावर उतरून जनतेचा आवाज बनणारा एकही ठोस विरोधी चेहरा दिसत नाही, हीच आजची कटू वास्तवस्थिती आहे.
देशभरात आणि राज्यातील अनेक भागांत महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, उद्योग–व्यापार अशा प्रश्नांवर आंदोलनांची धार वाढलेली असताना, गंगाखेडमध्ये मात्र राजकीय शांतता संशयास्पद वाटते. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विरोधात राष्ट्रीय मुद्द्यांवर रस्ता रोको, उपोषण, मोर्चे तर दूरच; साधे निवेदन देण्याचीही पुढाकार कोण घेत नाही, हे अधिकच धक्कादायक आहे.
विरोधी बाकावर असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासह बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सर्व पक्षीय आघाडी, आम आदमी पार्टी — यापैकी कोणीही ठामपणे जनतेसाठी पुढे येताना दिसत नाही.
ही राजकीय निष्क्रियता नेमकी कशामुळे?
स्थानिक पातळीवर तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. वीजपुरवठ्याचे खंडित वेळापत्रक, पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, दळणवळणातील अडचणी, राशन वितरणातील गोंधळ, शेती व शेतकरी प्रश्न, शिक्षणातील वाढता खर्च, विमा योजनांतील त्रुटी — या सगळ्या विषयांवर उघडपणे आवाज उठवणारा फारसा कोणी दिसत नाही. अपवाद म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष काही प्रमाणात भूमिका घेताना दिसतो; मात्र तो पुरेसा ठरत नाही.
सत्तेचा दबाव, निधीची कमतरता, नेतृत्वाचा अभाव की जनसामान्यांबाबत वाढलेली उदासीनता?
कारण काहीही असो, पण विरोधीपक्षाचा हा शून्यकारभार लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा मजबूत विरोध नसल्यास प्रशासन मनमानीकडे झुकते आणि त्याची किंमत थेट सामान्य नागरिकांना मोजावी लागते.
गंगाखेडमध्ये आज गरज आहे ती आवाज उठवणाऱ्या, रस्त्यावर उतरून प्रश्न विचारणाऱ्या आणि जनतेच्या बाजूने ठाम उभ्या राहणाऱ्या विरोधी नेतृत्वाची.
अन्यथा “विरोधीपक्ष आहे का?” हा सवाल केवळ प्रश्न न राहता, या मतदारसंघावर लागलेला कायमचा शिक्का ठरेल. .

 राजकीय आक्रमण 
“लक्ष्मीअस्त्रांनी मुर्च्छित लोकशाही!
विरोधी पक्ष नेते–कार्यकर्तेही बेशुद्ध अवस्थेत?”
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर एकच प्रश्न उभा राहतो —
सामान्य माणूस जसा ‘लक्ष्मीअस्त्रां’पुढे मुर्च्छित झाला आहे, तशीच गत विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्ते व समर्थकांचीही झाली आहे का?
लोकशाहीचे चार स्तंभ सांगितले जातात; मात्र प्रत्यक्षात सत्ताधारीच फक्त थोडेफार ॲक्टिव्ह दिसतात. तेही जनतेसाठी नव्हे, तर स्वहितासाठी. यातील अनेकजण मूळ पक्षाच्या विरोधात भूमिका घेत, संधीसाधूपणे भारतीय जनता पक्ष, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी हातमिळवणी करतात.
काम साधले की पुन्हा गुमान शांत घरवापसी — आणि उरलेली जनता मात्र बघ्याच्या भूमिकेत!
विरोधी बाकावर बसलेल्या पक्षांचे नेते, कार्यकर्ते, समर्थक —
रस्त्यावर उतरायची हिंमत नाही, निवेदन देण्याची तसदी नाही, आंदोलन तर दूरच!
लोकशाहीत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी, “परिस्थितीनुसार भूमिका” घेत स्वतःची सोय पाहिली जात आहे.
आज प्रश्न असा आहे —
ही भयग्रस्त शांतता आहे की पैशाच्या, सत्तेच्या व सौद्यांच्या नशेत आलेली मुर्च्छा?
नेतृत्वाचा अभाव आहे की जाणीवपूर्वक घेतलेली तटस्थतेची सोयीस्कर भूमिका?
एक मात्र स्पष्ट आहे —
विरोधी पक्ष निष्क्रिय, कार्यकर्ते गप्प, समर्थक उदासीन आणि जनता वैतागलेली
अशी ही स्थिती लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.
जर हे असेच सुरू राहिले, तर
“विरोधी पक्ष आहे का?”
हा प्रश्न राहणार नाही —
तो लोकशाहीवरचा थेट आरोप ठरेल.* …… क्रमशः

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …