परभणी,दि.20(प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या सत्र 2026-29 च्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ‘जय महेश’ पॅनलने 11 पैकी 8 महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर ‘समर्पित’ पॅनलला 3 पदांवर समाधान मानावे लागले. राज्यातील 11 विभागांमधील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नव्या कार्यकारिणीची निवड केली.
प्रदेशाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत जिंतूर येथील ब्रिजगोपाल रामनारायण तोष्णीवाल यांनी 316 मते मिळवत विजय संपादन केला. अर्थमंत्रीपदी संजय डाड यांना 327 मते, तर संघटनमंत्रीपदी उमेश मुंदडा यांना 308 मते मिळाली. मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी श्ययामसुंदर सोमाणी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी श्रीकांत लखोटिया आणि कोकण विभाग संयुक्तमंत्रीपदी गोविंद अट्टल यांची निवड झाली. उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नितीन बंग आणि संयुक्तमंत्रीपदी महेश बंग हे बिनविरोध निवडून आले.
‘समर्पित’ पॅनलकडून मराठवाडा विभाग संयुक्तमंत्रीपदी बालकिशन मुंदडा, पश्चिम महाराष्ट्र संयुक्तमंत्रीपदी सागर सारडा आणि कोकण विभाग उपाध्यक्षपदी राजेंद्र तापडिया यांनी विजय मिळविला.
दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जिंतूर, परभणी, मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांत माहेश्वरी समाजबांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. मिठाई वाटप, फटाक्यांची आतषबाजी आणि अभिनंदन कार्यक्रमांद्वारे विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पदाधिकार्यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत शिक्षण, आरोग्य, युवा सक्षमीकरण आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. एकतेतच शक्ती आणि संघटनातच विकास या ध्येयवाक्यासह नव्या कार्यकारिणीने पुढील तीन वर्षांच्या कार्यकाळाला प्रारंभ केला आहे.
Shabdraj www.shabdraj.com