हिंगोली, (दि. ८ ) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासकीय कामांना गती देण्यासोबतच, सर्वसामान्यांच्या योजनांचा आढावा आणि कार्यालयीन शिस्तीबाबत अत्यंत कडक निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान सीईओ विवेक गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. यामध्ये प्रामुख्याने प्रशासकीय गती आणि ई-फाईल: कार्यालयातील कामांमध्ये पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी ‘ई-फाईल’ प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासनाकडून प्राप्त झालेली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले. ‘आयुष्यमान भारत कार्ड’ आणि ‘वय वंदना कार्ड’ वाटपाच्या मोहिमेला गती देऊन पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले. याशिवाय ‘आपले सरकार’ पोर्टलवर नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींचे निवारण विहित मुदतीत करण्यावर भर देण्यात आला.’एकल महिला सक्षमीकरणा’ चा आढावा घेण्यात आला आणि ‘रस्ते डागडुगीकरण’ (रस्ते दुरुस्ती) वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या तसेच ‘कर्मचारी समाधान शिबिराची माहिती घेण्यात आली
आगामी ३ महिन्यांत १००% सोलरयुक्त’ होणार!
या बैठकीत सीईओ विवेक गायकवाड यांनी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणपूरक संकल्पना मांडली. येत्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायती १००% सोलरयुक्त (सौरऊर्जेवर चालणाऱ्या) करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील शासकीय संस्था वीज बिल समस्येतून मुक्त होऊन स्वयंपूर्ण बनणार
कार्यालयीन शिस्तीचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, असा स्पष्ट इशारा विवेक गायकवाड यांनी दिला आहे. सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर येण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
“प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक आहे. यापुढे जे कर्मचारी कार्यालयीन वेळेत उशिरा येतील, त्यांच्यावर थेट आणि कडक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असा इशारा दिला
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा. प्र.) समृद्धी दिवाने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, उपशिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) अशावरी काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) विपुन भागवत, कृषी अधिकारी अतुल वायसे, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
Shabdraj www.shabdraj.com