17/07/26
Breaking News

हिंगोलीत औषध विक्रेत्यांचा बंद; १२६० औषधी दुकाने बंद

हिंगोली | प्रतिनिधी
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत हिंगोली जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी मंगळवारी एकदिवसीय बंद पाळला. जिल्ह्यातील तब्बल १२६० मेडिकल व औषध विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
हिंगोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ऑनलाईन औषध विक्री, ई-फार्मसी तसेच औषध व्यवसायाशी संबंधित विविध समस्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष राजेश रामेश्वर शिंदे व जिल्हा सचिव संतोष तराचंद बहेती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हिंगोली शहरासह वसमत, कळमनुरी, सेनगाव आणि औंढा नागनाथ तालुक्यातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद होती. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, औषध विक्रेत्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, दरम्यान, अत्यावश्यक परिस्थिती लक्षात घेऊन काही ठिकाणी आपत्कालीन औषध सेवा सुरू ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या बंदमुळे जिल्हाभरातील औषध व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …