24/06/26
Breaking News

एचएआरसीच्या वतीने सेलू तालुक्यातील ४५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण

सेलू ( प्रतिनिधी )
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी यांच्या शैक्षणिक पालकत्व उपक्रम २०२६ अंतर्गत सेलू तालुक्यातील ४५ एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सेलू येथे शनिवार ता. २० रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. सचिन मंत्री हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण गाडेकर व रवी मंत्री यांची उपस्थिती होती. यावेळी एचएआरसीचे अध्यक्ष डॉ. पवन एस. चांडक, बाळू बुधवंत, प्रमोद देशमुख, रामराव गायकवाड, अनुराज रासकटला, संतोष माहुरकर आणि वाचन चळवळ समन्वयक माधव गव्हाणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवन चांडक यांनी केले, तर सूत्रसंचालन पांडुरंग पाटणकर यांनी केले.
या उपक्रमाचा लाभ वालूर, माले टाकळी, कुंडी, वाहेगाव, केमापूर, म्हाळसापूर, ब्रह्मवाकडी, काजळी रोहिणा, चिकलठाणा, देऊळगाव, साळेगाव, हादगाव, राजवाडी येथील ४५ विद्यार्थ्यांना झाला. हे सर्व विद्यार्थी एकल पालक असून त्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्याचे किट प्रदान करण्यात आले.
यासोबतच नववी व दहावीच्या परतूर, सातोना व नूतन विद्यालयातील एकल पालक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली.
या उपक्रमासाठी समाजातील दात्यांनी उत्स्फूर्त आर्थिक सहकार्य केले. डॉ. सतीश पंचदार, सीए रोहित मंत्री,रवींद्र मंत्री, सीए सागर तोतला, पवन मुंदडा, पराग पारीख,विनायक कुंटे, नरेश मोदानी, अल्पना डागा आणि स्वाती कुशवाहा यांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविणे शक्य झाले.
यावेळी लक्ष्मण गाडेकर यांनी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे महत्त्व व गरज सांगून भविष्यात या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजात दात्याच्या भूमिकेत उभे राहण्याचे आवाहन केले.आभार प्रदर्शन शरद ठाकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एचएआरसीचे पदाधिकारी, वाचन चळवळीचे कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच नानासाहेब पवार व दगडुबा माघाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …