18/07/26
Breaking News

प्रेमाचे आमिष दाखवत १५० महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या भामट्याला अटक

प्रेमाचे आमिष, आर्थिक लूट आणि फसवणुकीचा मोठा पर्दाफाश
धारूर / शब्दराज मीडिया –
सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून प्रेमाचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक व शारीरिक फसवणूक करणाऱ्या एका सराईत भामट्याला धारूर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने तब्बल १५० हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुनील गिताजी गिरी (रा. जमालपूर, ता. औसा, जि. लातूर) असे आहे. तो धारूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १९८/२०२६ मधील आरोपी असून अनेक दिवसांपासून फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे धारूर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून आणि डेटा तपासणीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

 

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांशी संपर्क साधत असे. विश्वास संपादन करून प्रेमाचे आमिष दाखवत तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. एका तक्रारदार महिलेच्या प्रकरणात आरोपीने तिला लातूर व पुणे येथे फिरण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. तसेच तिच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही त्याने हडप केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोबाईलमधील माहितीवरून त्याने अशाच प्रकारे सुमारे १५० महिलांशी संपर्क साधून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू असून आणखी पीडित महिला समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कारवाईत पोलीस हवालदार बाळासाहेब डापकर, विकास चोपणे, मिसाबदीन इनामदार, मल्लिकार्जुन माने तसेच पोलीस शिपाई अशपाक इनामदार, करांडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही व्यक्तीची ओळख आणि माहिती पडताळून पाहिल्याशिवाय आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …