प्रतिनिधी | गंगाखेड
गंगाखेड शहरात सध्या घाणीचं अक्षरशः साम्राज्य माजलं असून, स्वच्छतेची अवस्था पूर्णपणे ढासळली आहे. नगर परिषद प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा थेट आरोप यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका कविता संदीप राठोड यांनी केला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सोमवार (दि.९) रोजी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात नगरसेविका राठोड यांनी संतप्त शब्दांत सांगितले की, शहरातील अनेक प्रभागांमध्ये महिनोमहिने नाल्यांची साफसफाई झालेली नाही. नाल्या तुंबल्या आहेत, दुर्गंधी सुटली आहे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुख्य रस्ते असोत की अंतर्गत गल्लीबोळ—सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. घंटागाड्या नावालाच असून नियमित फिरत नसल्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेत जगावे लागत आहे.
“आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला, निवेदने दिली, बैठका झाल्या; पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. प्रशासन फक्त गोड बोलून वेळकाढूपणा करत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. शहरातील वाढत्या घाणीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याशी सरळ खेळ सुरू असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय शहरात मोकाट कुत्रे व डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. यापूर्वी लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांवर चावे घेण्याच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तरीही प्रशासन ढिम्म आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
नगरसेविका राठोड यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “शहरातील घाणीवर तात्काळ नियंत्रण आणावे, नाल्यांची व रस्त्यांची नियमित स्वच्छता करावी, मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाशिवाय पर्याय नाही.”
दररोज मोठ्या संख्येने नागरिक स्वच्छतेच्या तक्रारी घेऊन येत आहेत.
प्रशासकीय पातळीवर बैठका होतात; पण तोडगा शून्य.
प्रशासन व लोकप्रतिनिधी फक्त बोलघेवडेपणा करत आहेत.
नगराध्यक्षा व उपाध्यक्ष यांना वेळोवेळी मागणी करूनही काहीच फरक नाही.
“आंदोलन केल्याशिवाय विकास होत नाही; आता शंखनाद करावाच लागणार,” असा ठाम इशारा सौ. कविता संदीप राठोड यांनी दिला आहे.लोकप्रतिनिधीने थेट आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने आता प्रशासन जागं होणार का, की नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरणार—याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.
Shabdraj www.shabdraj.com