सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरची रात्र नेहमीच खास असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मद्यपींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे यंदाचं नववर्ष अधिक दणक्यात साजरं करता येणार आहे.
राज्याच्या गृह विभागाने ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. तसेच बार आणि क्लबमध्ये पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यसेवन करता येणार आहे. अन्य दिवशी मात्र रात्री १०.३० वाजेपर्यंतच मद्यविक्रीला परवानगी असते. नववर्षाच्या स्वागतासाठी ही वेळ वाढवण्यात आली आहे.
मात्र, सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून जिल्हाधिकारी स्थानिक गरजेनुसार या वेळेत कपात करू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने, या नववर्ष पार्ट्यांवर प्रशासनाची विशेष आणि करडी नजर राहणार आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, फक्त वेळ वाढवण्यात आली म्हणून नियम धाब्यावर बसवता येणार नाहीत. मद्यविक्री व मद्यसेवनासाठी अधिकृत परवाना असणे अनिवार्य असून, पार्टी आयोजित करण्यापूर्वी किंवा मद्य खरेदी करण्यापूर्वी संबंधित परवाना बाळगणे बंधनकारक राहील.
Shabdraj www.shabdraj.com